अबुधाबी - सूर्यकुमार यादवने बुधवारी झालेल्या बंगळुरूविरोधातील सामन्यात तडाकेबंद खेळी करत मुंबईला विजय मिळवून दिला. विराटने या सामन्यात सूर्यकुमारविरोधात स्लेजिंग करत त्याला उकसवण्याचा प्रयत्न केला. तरी देखील सूर्यकुमारने आपला संयम ढळू न देता नाबाद खेळी केली. सूर्यकुमारच्या या खेळीमुळे मुंबईला बंगळुरूवर सहज विजय मिळवता आला. या विजयानंतर सूर्यकुमार यादवने केलेले सेलिब्रेशन ही बोलकी प्रतिक्रिया असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
मी आहे ना, सूर्यकुमारचे सेलिब्रेशन -
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सूर्यकुमार यादवची निवड निश्चीत मानली जात होती. पण निवड समितीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याला भारतीय संघात खेळण्याची संधी दिली नाही. पण सूर्यकुमारने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या बंगळुरू संघाविरोधात मॅच विनिंग खेळी साकारली आणि पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केले. मुंबईच्या विजयानंतर 'मी आहे ना' असा इशारा त्याने ड्रेसिंग रुमच्या दिशेने केला.
सूर्यकुमार यादवने केलेल्या इशाऱ्यावर प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनी मत व्यक्त केले. ते म्हणाले की, सूर्यकुमार या मॅचमध्ये स्वत:ची बाजू मांडत होता. तो सर्वांना म्हणत होता, की माझ्याकडे पाहा मी खेळू शकतो, असंच तो सूचवत होता.
दरम्यान, बंगळुरूविरोधातील सामन्यामध्ये सूर्यकुमारने ४३ चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ७९ धावांची खेळी साकारली. त्याने चौकार मारत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
हेही वाचा - MI vs RCB : मुंबईचा विराटसेनेवर पाच गडी राखून विजय...प्ले-ऑफमध्ये स्थान निश्चित
हेही वाचा - कपिल देव मित्रांच्या व्हॉटस्अॅप ग्रुपवर सक्रिय; प्रकृती सुधारत असल्याचा व्हिडिओ केला पोस्ट