दुबई - इंडियन प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात 'महामुकाबला' होणार आहे. यात विद्यमान विजेते मुंबई इंडियन्सकडे पाचव्यांदा तर दिल्ली कॅपिटल्सकडे पहिल्यांदा विजेतेपद मिळवण्याची संधी आहे. हा सामना चुरशीचा होण्याची आशा आहे.
अंतिम फेरीत आलेल्या दोन्ही संघांनी स्पर्धेत शानदार कामगिरी केली आहे. गुणतक्त्यात देखील हे संघ पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर होते. विशेष म्हणजे या दोन्ही संघांकडे जगातील अव्वल क्रमांकाचे जलद गोलंदाज आहेत. दिल्लीकडे कागिसो रबाडा आणि एनरिक नॉर्जिया तर मुंबईकडे जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट अशी जोडी आहे.
दोन्ही संघ तुल्यबळ
गोलंदाजी नाही तर फलंदाजी देखील दोन्ही संघांची चांगली आहे. दिल्लीकडून शिखर धवन, श्रेयस अय्यर, मार्कस स्टॉयनिस सातत्याने धावा करत आहेत. दिल्लीच्या तुलनेत मुंबईची बाजू चांगली आहे. रोहित शर्मा वगळता क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन यांनी कोणत्या ना कोणत्या सामन्यात विजय मिळवून दिला आहे. हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या आणि केरॉन पोलार्ड यांनी हाणामारीच्या षटकात स्फोटक फलंदाजी करुन मुंबईला मोठी धावसंख्या उभी करून दिली आहे.
डेड टू हेड
उभय संघांमध्ये आतापर्यंत २७ सामने झाले आहेत. यात १५ सामने मुंबईने जिंकले आहेत तर १२ सामन्यात दिल्लीने बाजी मारली आहे. असे असले तरी या हंगामात मुंबई आणि दिल्ली यांच्यात ३ सामने झाले आहेत. हे सर्व सामने मुंबईने एकतर्फा जिंकले आहेत.
संभाव्य संघ
- मुंबई इंडियन्स - क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड, कृणाल पांड्या, जेम्स पॅटिन्सन, ट्रेंड बोल्ट, राहुल चाहर आणि जसप्रीत बुमराह.
- दिल्ली कॅपिटल्स - शिखर धवन, मार्कस स्टॉयनिस, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिमरॉन हेटमायर, प्रवीण दुबे, अक्षर पटेल, आर अश्विन, कागिसो रबाडा आणि एनरिक नॉर्जिया.