आबुधाबी - आयपीएल २०२० ची सुरुवात रोमांचक सामन्याने झाली. गतविजेता मुंबई इंडियन्सला उपविजेत्या चेन्नई सुपर किंग्जने मात दिली. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात चेन्नईने ५ गडी राखून विजय मिळवला. चेन्नईच्या विजयात 'या' पाच खेळाडूंनी मोलाचे योगदान दिले. वाचा कोण आहेत. ते खेळाडू...
फाफ डु-प्लेसिस -
दक्षिण आफ्रिकेचा ३६ वर्षीय खेळाडू फाफ डु-प्लेसिसने मुंबई विरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीत योगदान दिले. त्याने सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करताना दोन अप्रतिम झेल टिपले. त्याने सौरभ तिवारी आणि हार्दिक पांड्याचा झेल घेत मुंबई इंडियन्सच्या धावगतीला ब्रेक लावला. यानंतर त्याने संघाची अवस्था ६ धावांवर २ बाद अशी झाली असताना डाव सावरत नाबाद अर्धशतक झळकावले. त्याने ४४ चेंडूत नाबाद ५८ धावा करत संघाला विजय मिळवून दिला.
अंबाती रायुडू -
अंबाती रायुडूने स्फोटक फलंदाजी करत मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची चांगली धुलाई केली. त्याने ४८ चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकारांसह ७१ धावांची खेळी केली. त्याने तिसऱ्या गडीसाठी फाफ डु-प्लेसिससोबत मिळून ११५ धावांची महत्वपूर्ण भागिदारी केली.
सॅम करन -
इंग्लंडचा २२ वर्षीय युवा खेळाडू सॅम करनने गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिनही आघाड्यावर चांगली कामगिरी केली. त्याने रोहित शर्मा आणि सुर्यकुमार यादव यांना झेलबाद केले. याशिवाय त्याने मुंबईचा डावखुरा सलामीवीर क्वीटंन डी कॉकला बाद केले. फलंदाजीत त्याने मोक्याच्या क्षणी आक्रमक १८ धावा केल्या.
लुंगी एनगिडी -
वेगवान गोलंदाज एनगिडीने चार षटकात ३८ धावांत तीन गडी बाद केले. त्याने दुसऱ्या स्पेलमध्ये कृणाल पांड्या, केरॉन पोलार्ड आणि जेम्स पॅटिन्सन याला बाद करत मुंबई इंडियन्सच्या धावगतीला वेसण घातली.
रविंद्र जडेजा -
अष्टपैलू खेळाडू जडेजाने या सामन्यात एका षटकात हार्दिक पांड्या आणि सौरभ तिवारीला बाद केले. याशिवाय त्याने फलंदाजीत पाच चेंडूत दहा धावा करत संघाला विजय मिळवून दिला.
हेही वाचा - IPL २०२० : डु-प्लेसिसची कमाल; सीमारेषेवर हवेत सूर घेत टिपले २ झेल, पाहा व्हिडिओ