आबुधाबी - कोलकाता नाइट रायडर्सने बुधवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जवर मात केली. अखेरच्या षटकात कोलकाताच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत सामना १० धावांनी जिंकला. दरम्यान, या सामन्यात फिरकीपटू कुलदीप यादवला अंतिम संघात स्थान मिळाले नव्हते. आतापर्यंत दोन सामन्यात कुलदीप संघाबाहेर बसला असून यामागचे कारण आता समोर आले आहे. केकेआरचा गोलंदाजी प्रशिक्षक काइल मिल्सने कुलदीपला संघाबाहेर ठेवण्यामागचे कारण सांगितले.
कुलदीपला संघाबाहेर ठेवल्याबाबत मिल्स म्हणाला की, आबुधाबीतील शेख झायेद मैदानाचे आकार काहीसे लहान आहे. तसेच संघाचे कॉम्बिनेशन पाहून कुलदीपला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला. आबुधाबीच्या संथ खेळपट्टीवर कुलदीप नक्कीच प्रभावी ठरला असता. पण मैदानाचे आकार आणि संघाचे संतुलन पाहता जो अंतिम संघ निवडण्यात आला, त्यात कुलदीप बसत नव्हता.'
कुलदीपला आतापर्यंत तीन सामन्यात केवळ ९ षटके गोलंदाजी केली आहे. यात त्याला एक गडी बाद करता आला आहे. दरम्यान, चेन्नईविरुद्धच्या सामन्यात कोलकाताच्या गोलंदाजांनी महत्वाच्या क्षणी विकेट घेत चेन्नईला बॅकफूटला ढकलले. कोलकात्याकडून शिवम मवी, वरुण चक्रवर्ती, नागरकोटी, नारायण आणि रसेल यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. तर प्रथम फलंदाजीदरम्यान, ८१ धावा करणारा राहुल त्रिपाठी सामनावीर ठरला.
हेही वाचा - CSK VS KKR : राहुल नाम तो सुना होगा ! शाहरूखच्या डायलॉगवर त्रिपाठीला आवरले नाही हसू, पाहा व्हिडीओ
हेही वाचा - 'धोनीच्या नेतृत्वात चेन्नईला असा संघर्ष करताना कधीच पहिलं नाही'