अबूधाबी - आयपीएलच्या १३ व्या हंगामाला सुरूवात होण्याआधीच चेन्नईचे १३ सदस्य, बीसीसीआयच्या वैद्यकीय टीममधील एक जण आणि दिल्ली कॅपिटल्सचे फिजिओ कोरोनाबाधित झाले. यामुळे खेळाडूंसह फ्रेंचायझी चिंताग्रस्त आहेत. अशात एक खेळाडू मात्र बिनधास्त आहे. मला कोरोना झाला तरी मी लढेन, असा आत्मविश्वास, त्या खेळाडूने व्यक्त केला आहे.
शिखर धवन आयपीएलसाठी युएईमध्ये आहे. त्याला क्रिकेट खेळताना कोरोनाची भिती वाटत नाही का? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना धवन म्हणाला की, 'मला माझ्या शरीरावर पूर्णपणे विश्वास आहे. त्यामुळे कोरोनाला मी घाबरत नाही. मला माहिती आहे की, मला देखील कोरोनाची लागण होऊ शकतो. पण मी कोरोनाशी लढू शकतो. सद्या आम्ही सर्व सुरक्षेचे नियम पाळत आहोत. आतापर्यंत आमच्या ८ ते ९ वेळा कोरोनाच्या चाचण्या झाल्या आहेत. या सर्व निगेटिव्ह आहेत.'
दरम्यान, १९ सप्टेंबरपासून सुरूवात होणाऱ्या आयपीएलच्या १३ व्या हंगामाचे वेळात्रक रविवारी जाहीर करण्यात आले आहे. स्पर्धेचा सलामीचा सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात अबूधाबी येथे रंगणार आहे. नव्या वेळापत्रकानुसार २४ सामने दुबई, २० सामने अबूधाबी आणि १२ सामने शारजामध्ये होणार आहेत. या स्पर्धेतील सायंकाळचे सामने भारतीय वेळेनुसार, ७ वाजून ३० मिनिटांनी सुरू होतील, तर डबल हेडरचे १० सामने दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी सुरू होतील. या हंगामाची उत्सुकता चाहत्यांमध्ये पाहायला मिळत आहे.
हेही वाचा - Eng vs Aus : 'बटलरला रोखण्यासाठी खास रणनिती आखावी लागेल'
हेही वाचा - 'जर रसेल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आला, तर ठोकू शकतो द्विशतक'