मुंबई - इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धा म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणीच असते. आपल्या आवडत्या खेळाडूंना एकाच संघात पाहण्यासाठी क्रिकेटवेडे मैदानात तुफान गर्दी करतात. चाहत्यांचा उत्साह वाढवण्यासाठी यंदाच्या आयपीएल स्पर्धेत मोठा बदल होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - सरफराजला टी-२० आणि कसोटी संघातून मिळाला डच्चू
एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार १ एप्रिल ते ३० मे २०२० या कालावधीत आयपीएल स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाच्या लीगचा कालावधी वाढणार असून चाहत्यांसाठी क्रिकेटची मेजवानी ठरणार आहे. बीसीसीआय आयपीएलमधील रात्रीच्या सामन्यांना अधिक पसंती देणार असल्याने हा कालावधी वाढणार आहे. प्रत्येक दिवशी फक्त एकच सामना खेळवला जावा, असा बीसीसीआयचा मानस आहे.
संध्याकाळी खेळवण्यात येणाऱ्या सामन्यांना मुंबई इंडियन्स संघाने विरोध केला होता. रात्रीच्या सामन्यांपेक्षा दुपारच्या सामन्यांना लोकांची गर्दी कमी असते. त्यामुळे मुंबईच्या संघाने विरोध दर्शवला होता. शिवाय, आयपीएल एप्रिल-मे मध्ये खेळवली जाते त्यावेळी भारतातील हवामान उष्ण असते. त्यामुळे खेळाडूही तक्रार करतात.
पुढील वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात टी-२० विश्वकरंडक स्पर्धा पार पडणार असल्याने बीसीसीआयला दोन महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. त्यामुळे आयपीएलच्या कालावधीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.