नवी दिल्ली - इंडियन प्रीमियर लीग 2020 च्या हंगामासाठी 19 डिसेंबरला लिलाव प्रकिया होणार आहे. हा लिलाव कोलकाता येथे पार पडणार असून या लिलावासाठी एकूण 971 क्रिकेटपटूंनी नोंदणी केली होती. त्यातून 332 खेळाडूंची नावे अंतिम यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत.
लिलावासाठी सुरुवातीला आलेल्या 971 खेळाडूंच्या यादीत 713 भारतीय आणि 258 परदेशी खेळाडू होते. त्यानंतर आता 332 खेळाडूंच्या नावाला मंजुरी देण्यात आली असून त्यात टीम इंडियाकडून खेळलेले 19 खेळाडू आहेत. याशिवाय मूळ यादीत नसलेला विंडीजचा केसरिक विलियम्स, बांगलादेशचा मुश्फिकुर रहीम, ऑस्ट्रेलियाचा लेगस्पिनर अॅडम झम्पा, इंग्लंडचा युवा खेळाडू विल जॅक्स यांसारख्या 24 नवोदित खेळाडूंची नावे अंतिम यादीत समाविष्ट आहेत. 332 खेळाडूंच्या नावाची यादी आठही संघांच्या व्यवस्थापनाकडे पाठवण्यात आली आहे.
दरम्यान, ही लिलाव प्रक्रिया केवळ एक दिवसात पूर्ण केली जाणार आहे. या प्रक्रियेदरम्यान आठ फ्रेंचाईजींना पूर्ण संघ निवडण्यासाठी एकूण 73 खेळाडू हवे आहेत. त्यापैकी 29 खेळाडू परदेशी असतील.
या खेळाडूंवर नजर -
रॉबिन उथप्पा, जयदेव उनाडकट, ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स, जोश हेजलवूड, मिचेल मार्श, डेल स्टेन, अँजेलो मॅथ्यूज यांच्यासह युवा खेळाडूंवरही नजर असणार आहे.