शारजाह - आयपीएलच्या तेराव्या हंगामात आज दोन सामने खेळले जाणार आहेत. यात पहिला सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल्स चॅलेंजर बंगळुरू यांच्यात दिवसा आबुधाबीच्या मैदानावर खेळला जाईल. तर, सायंकाळी कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमने-सामने येतील.
केकेआर आणि दिल्ली यांच्यातील सामना शारजाहच्या मैदानावर होणार असून यात धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कारण, शारजाहच्या मैदानाची सीमारेषा तुलनेने लहान आहे. तर, केकेआरला हळूहळू सूर गवसत असल्याचे संकेत मिळाले आहेत. दिल्ली संघाला गेल्या लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले होते.
केकेआरने मागील सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा पराभव केला होता. या सामन्यात केकेआरने गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाडीवर चांगली कामगिरी नोंदवली होती. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात केकेआरचे युवा वेगवान गोलंदाज कमलेश नागरकोटी व शिवम मावी यांनी शानदार कामगिरी केली होती, पण आजच्या सामन्यात त्यांची खरी कसोटी असणार आहे. कारण शारजाहची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल आहे.
केकेआर आपला विजयी संघ कायम ठेवण्याची शक्यता आहे. युवा सलामीवीर शुबमन गिल सातत्याने धावा करत आहे. तर, दुसरा सलामीवीर सुनील नरेनला अद्याप मोठी खेळी करता आलेली नाही. कर्णधार दिनेश कार्तिकही धावा करण्यात अपयशी ठरला आहे. नितेश राणा आणि इयॉन मॉर्गन मधल्या फळीत धावा करत आहेत. रसेलने राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यात दुबईतील मोठ्या मैदानावर तीन षटकार ठोकत सूर गवसल्याचे संकेत दिले आहेत.
दुसरीकडे, दिल्लीच्या संघात युवा खेळाडूंचा भरणा आहे. यात पृथ्वी शॉ, कर्णधार श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, मार्कस स्टोइनिसचा समावेश आहे. त्यांना अनुभवी शिखर धवनची साथ असेल. पण, शिमरोन हेटमायरला अद्याप विशेष छाप सोडता आलेली नाही. गोलंदाजीत कागिसो रबाडा व अमित मिश्रा चांगल्या फॉर्मात आहेत.
- दिल्ली कॅपिटल्सचा संघ -
- श्रेयस अय्यर (कर्णधार), रवीचंद्रन अश्विन, शिखर धवन, पृथ्वी शॉ, शिमरोन हेटमेयर, कागिसो रबाडा, अजिंक्य रहाणे, अमित मिश्रा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशांत शर्मा, अक्षर पटेल, संदीप लामिछाने, किमो पॉल, डेनियल सॅम्स, मोहित शर्मा, एनरिक नॉर्ट्जे, अॅलेक्स कैरी, अवेश खान, तुषार देशपांडे, हर्षल पटेल, मार्कस स्टोइनिस आणि ललित यादव.
- कोलकाता नाइट राइडर्सचा संघ -
- दिनेश कार्तिक (कर्णधार आणि यष्टीरक्षक), आंद्रे रसेल, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्यूसन, नितीश राणा, प्रसिद्ध कृष्णा, रिंकू सिंह, संदीप वारियर, शिवम मावी, शुभमन गिल, सिद्धेश लाड, सुनील नारायण, पॅट कमिंन्स, इयॉन मॉर्गन, वरुण चक्रवर्ती, टॉम बँटन, राहुल त्रिपाठी, ख्रिस ग्रीन, एम सिद्धार्थ, निखिल नाइक आणि अली खान.