मेलबर्न - कोरोनासदृश परिस्थिती पाहता ऑस्ट्रेलिया सरकारने आपल्या खेळाडूंना विदेश दौरा करण्यास मज्जाव केला आहे. जर खेळाडू विदेश दौरा करणार असतील, ते स्वत:च्या जबाबदारीने करावं, असे ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केलं आहे. यामुळे ऑस्ट्रेलियाचे १७ खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी होणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॅरिसन यांनी सांगितलं की, 'कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ऑस्ट्रेलिया सरकारने कठोर पाऊल उचलले आहे. यात ऑस्ट्रेलियन नागरिकांना विदेश दौऱ्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. हे निर्बंध पुढील महिन्यापर्यंत लागू असतील.'
इंडियन प्रीमिअर लीगच्या १३ हंगामाला २९ मार्चपासून सुरुवात होणार होती. पण भारतात कोरोनाचा झालेला प्रसार पाहता, बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा पुढे ढकलली आणि ही स्पर्धा १५ एप्रिलापासून सुरू करण्यात येईल, असे सांगितले. ऑस्ट्रेलिया सरकारचे निर्देश पाहता, ऑस्ट्रेलियन खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी होणार की नाही, यावर साशंकता आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलिया सरकारने स्वत:च्या जबाबदारीवर विदेश दौरा करावा, असे सांगितले आहे. जर खेळाडूंनी आपल्या जबाबदारीवर दौरा केला त्यात त्यांना काही झाल्यास, त्या खेळाडूला विमा रक्कम मिळणार नाही. अशात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचने एका रेडिओ स्टेशनवर बोलताना सांगितले की,'ऑस्ट्रेलिया सरकार प्रत्येक एका तासाला नवी निर्देश देत आहे.'
आयपीएल आणि विदेशी खेळाडू -
आयपीएलच्या १३ हंगामात ८ संघ सहभागी होणार आहेत. या संघामध्ये ६४ विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. यात सर्वात जास्त १७ ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आहेत. १३ व्या हंगामाच्या लिलावात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सवर सर्वाधिक बोली लागली होती. कोलकाता नाइट रायडर्सने कमिन्सवर १५.५० कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात सामील करून घेतले आहे.
हेही वाचा - कोरोना पळवण्यासाठी मराठमोळ्या अजिंक्यने सांगितला उपाय, पाहा व्हिडिओ
हेही वाचा - Corona Virus : भारतातून मायदेशी परतले आफ्रिकन खेळाडू; १४ दिवस जाणार एकांतवासात