मुंबई - 'इंडियन प्रीमियर लीग-२०१९' चा रोमांच वाढत आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. जगातील सर्वात लोकप्रिय लीगमध्ये हे युवा खेळाडू पदार्पण करणार आहेत. या युवा खेळाडूंच्या कामगिरीवर साऱ्यांची नजर असेल.
सॅम कुरेन
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम कुरेन याला किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने ७.२ कोटींना आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले. २२ वर्षाच्या या खेळाडूने भारताच्या इंग्लंड दौऱयात दमदार कामगिरी करुन साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याने त्या मालिकेत २७२ धावा केल्या होत्या. सोबतच गोलंदाजी करताना महत्त्वपूर्ण बळी टिपले होते. पंजाबलाही अशाच कामगिरीची अपेक्षा आहे.
मिचेल सँटनर
न्यूझीलंडचा हा स्टार खेळाडू चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळतोय २०१८ साली दुखापतीमुळे तो खेळू शकला नाही. डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करणारा सँटनरला ५० लाखात चेन्नईने विकत घेतले होते.
शिमरोन हेटमायर
विंडीजचा युवा स्फोटक फलंदाज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणार आहे. त्याला ४.२ कोटी रुपये देऊन विकत घेतले आहे. विंडीजच्या भारत दौऱ्यात त्याने २५९ धावा काढून भारतीय गोलंदाजांची चांगलीच दमछाक केली होती.
वरुण चक्रवर्ती
किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाने फिरकीपटू वरुण चक्रवर्तीवर ८.४० कोटी रुपयांची बोली लावली. कर्नाटकचा २७ वर्षीय मिस्ट्री फिरकी गोलंदाज लीस्ट ए च्या ९ सामन्यात २२ गडी बाद केलेत. आयपीएलमध्ये कशी छाप सोडतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.
अॅश्टन टर्नर
राजस्थान रॉयल्सच्या संघाने ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूला ५० लाखात विकत घेतले. बिग बॅश लीगमध्ये त्याने पर्थ स्काचर्सकडून खेळताना १४ सामन्यांत ३७८ धावा कुटल्या. राजस्थान रॉयल्सच्या संघाला अशाच धमाकेदार खेळीच्या अपेक्षा त्याच्याकडून आहेत.