चंदीगड - श्रीलंका टी-20 लीगचा अनधिकृत सामना आयोजित करण्यासाठी चंदीगडमध्ये अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी रवींदर दांडीवालला शुक्रवारी सहा आठवड्यांचा अंतरिम जामीन मिळाला. पंजाबमधील न्यायालयाने दांडीवाल व अन्य दोघांना एक दिवस आधी न्यायालयीन कोठडी सुनावली होती. दांडीवाल याच्यावर आंतरराष्ट्रीय टेनिस सामना फिक्सिंगचा आरोप आहे.
या प्रकरणात दांडीवालविरूद्ध थेट तक्रार नाही, असे दांडीवालच्या वकिलांनी म्हटले आहे. गेल्या आठवड्यात दिल्लीहून अटक करण्यात आलेला आणखी एक आरोपी दुर्गेश यालाही न्यायालयाने सहा आठवड्यांच्या अंतरिम जामीन मंजूर केला.
पाच दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर दोन्ही आरोपींना गुरुवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तेथे दोघांनी जामीन मागितला होता आणि न्यायालयाने त्यांचा निकाल शुक्रवारपर्यंत राखून ठेवला. सामन्याच्या प्रसारणासाठी कॅमेरे पुरवले असल्याचा दुर्गेशवर आरोप आहे.
चंदीगडच्या सवारा गावात पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमधील काही खेळाडू सामना खेळत होते. हा सामना श्रीलंकेच्या युथ टी-20 लीगचा सामना म्हणून प्रसारित झाला. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, "यात खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना 5000 ते 10,000 रुपये देऊन खेळायला बोलावले होते. काही रणजी खेळाडूंची भूमिका देखील तपासण्यासारखी आहे. ज्या खेळाडूंच्या त्वचेचा रंग काळा होता, ते श्रीलंकेचे खेळाडू खेळत आहेत, असे दिसून येईल म्हणून निवडले गेले होते.''