मुंबई - इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत १-० ने पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाला एक जबर धक्का बसला आहे. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा कसोटी मालिकेतून बाहेर पडला असल्याची माहिती मिळत आहे.
रविंद्र जडेजाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटी दरम्यान, दुखापत झाली होती. त्यामुळे तो ब्रिस्बेन येथील कसोटी सामना खेळू शकला नव्हता. त्याचा अंगठा फॅक्चर झाला होता.
जडेजावर बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये उपचार सुरू होते. यादरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. जडेजा तिसऱ्या कसोटीआधी फिट होईल, अशी माहिती मिळत होती. पण तो दुखापतीतून अद्याप सावरलेला नाही, यामुळे तो संपूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर पडला असल्याची माहिती मिळत आहे.
शमी दुखापतीतून सावरला...
भारतीय संघाचा मध्यमगती गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीतून सावरला असून त्याने सरावाला सुरूवात केली आहे. शमीने गोलंदाजी करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. शमीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अॅडिलेड येथे खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दुखापत झाली होती. यामुळे त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित तीनही कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली होती.
दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यात ४ सामन्याची कसोटी मालिका खेळवली जात आहे. यातील पहिला सामना इंग्लंडने २२७ धावांनी जिंकत मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. उभय संघात दुसरा सामना चेन्नईमध्येच खेळला जाणार आहे. या सामन्याला १३ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे.
हेही वाचा - कुलदीपच्या प्रशिक्षकाचे विराटसह संघ व्यवस्थापनावर गंभीर आरोप
हेही वाचा - Ind vs Eng : 'पुढील सामना हरल्यास विराट कर्णधारपद सोडून देईल'