कोलकाता - सर्वांना उत्सुकता लागून राहिलेल्या भारत विरूद्ध बांगलादेश यांच्यात होणाऱ्या डे-नाईट कसोटी सामन्याची 'वेळ' निश्चित झाली आहे. २२ ते २६ नोव्हेंबर दरम्यान कोलकाता येथे हा 'पिंक बॉल' कसोटी सामना दुपारी १ ते रात्री ८ वाजेपर्यंत खेळवण्यात येणार आहे.
हेही वाचा - आयसीसीच्या क्रमवारीत कोहली-बुमराहचे राज्य, तर शाकिबला मोठा 'धक्का'
हिवाळ्यामध्ये पडणाऱ्या दवाचा विचार करता बीसीसीआय आणि बंगाल क्रिकेट असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे. याबाबत एका अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला माहिती दिली. 'दव पाहता बीसीसीआयने बंगाल क्रिकेट असोसिएशनची खेळाची परिस्थिती बदलण्याची विनंती मान्य केली आहे. दिवसाचा खेळ आता दुपारी एक वाजता सुरू होईल आणि पहिले सत्र तीन वाजता संपेल. दुसरे सत्र दुपारी ३:४० वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी ५:४० वाजता समाप्त होईल. अंतिम सत्र ६ ते ८ वाजेपर्यंत चालेल', असे या अधिकाऱ्याने सांगितले आहे.
जागतिक क्रिकेटमध्ये डे-नाईट कसोटीला आधीच सुरुवात झाली आहे. मात्र, भारतात अशा प्रकारचा हा पहिलाच सामना होत आहे. क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच गुलाबी रंगाचा चेंडू वापरून डे-नाईट कसोटी सामना खेळवला जाणार असल्याने त्याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.