नवी दिल्ली - आगामी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघ एक आठवड्याचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण करणार आहे. संघाच्या एका सदस्याने याविषयी माहिती दिली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेत यजमान संघाचा २-१ ने धुव्वा उडवल्यानंतर भारतीय संघासमोर आता इंग्लंडचे आव्हान आहे. पुढील महिन्यात इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे.
हेही वाचा - भारत वि. इंग्लंड : चेन्नईतील कसोटी सामन्यांसाठी प्रेक्षकांना डावलले
भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण म्हणाले, "आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये एक असाधारण कामगिरी केली आहे. आम्ही आमच्या प्रत्येक क्षणाचा आनंद लुटला आहे. पण, आता आम्हाला ते विसरण्याची गरज आहे. इंग्लंविरुद्धची मालिका हे आमचे भविष्य असून यासाठी आमच्याकडे योजना आहेत. आमच्याकडे वेळ आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारतीय संघ एक आठवड्याचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण करेल आणि याच काळात योजना तयार कराव्या लागतील.''
इंग्लंडचा संघ या दौऱ्यात ४ कसोटी, ५ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामने खेळणार आहेत. यातील दोन कसोटी सामने चेन्नईत, उर्वरित दोन सामने आणि टी-२० मालिका अहमदाबाद तर एकदिवसीय मालिका पुण्यात खेळवली जाणार आहे. अरुण म्हणाले, "आम्हाला माहिती आहे की, इंग्लंड हा एक अतिशय खडतर संघ आहे. त्यांचा पराभव करण्यासाठी आम्हाला सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतील."