वेलिंग्टन - भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला २१ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेमुळे यंदा कसोटी क्रिकेटला अधिक महत्व प्राप्त झालं आहे. भारतीय संघ सध्या या स्पर्धेत अव्वल स्थानी असून न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकत आपली दावेदारी मजबूत करण्याच्या इरादा भारतीय संघाचा आहे. कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आम्ही फिटनेस आणि एकाग्रतेच्या जोरावर कोणत्याही संघाचा कोठेही सामना करु शकतो, असा विश्वास व्यक्त केला आहे.
विराट आयोजित पत्रकार परिषदेमध्ये म्हणाला की, 'आम्ही आमच्या क्षमतेवर लक्ष्य केंद्रीत करतो. यामुळे आम्हाला विरोधी संघ किती संयमी आहे याचा फरक पडत नाही. इतर संघाच्या तुलनेत न्यूझीलंड संघ जास्त संयमी आहे. पण मला वाटतं की आम्ही फिटनेस आणि एकाग्रता याच्या जोरावर जगातील कोणत्याही ठिकाणी आणि कोणत्याही संघाचा सामना करु शकतो.'
भारत-न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना २१ ते २५ फेब्रुवारी या काळात वेलिंग्टन येथे खेळला जाणार आहे. तर दुसरा कसोटी सामना २९ फेब्रुवारी ते ०४ मार्च दरम्यान ख्राईस्टचर्च येथे होणार आहे. दोन्ही सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे ४ वाजता सुरु होणार आहेत.
दरम्यान दोन्ही संघात आतापर्यंत २१ कसोटी मालिका झाल्या आहेत. यापैकी ११ मालिका भारताने जिंकल्या आहेत तर पाच मालिकेत न्यूझीलंडने विजय मिळवला आहे. कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड संघात ट्रेंट बोल्टचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे न्यूझीलंडच्या गोलंदाजाची धार वाढली आहे.
हेही वाचा -
T२० Ranking : विराटची घसरण, मॉर्गन आणि डी कॉकची मोठी झेप
हेही वाचा -
Women T२० WC २०२० : भारतीय संघाची कामगिरी अन् विश्व करंडकाबाबत बरंच काही, जाणून घ्या