नवी दिल्ली - ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चमकदार कामगिरी केलेल्या भारताच्या मोहम्मद सिराजने स्वत: साठी बीएमडब्ल्यू कार खरेदी केली आहे. सिराजने शुक्रवारी त्याच्या इंस्टाग्राम पेजवर नवीन कारचा व्हिडिओ शेअर केला. ऑटोरिक्षा चालकाचा मुलगा ते टीम इंडियाचा गोलंदाज असा संघर्षमय प्रवास करणाऱ्या सिराजने आपल्या कामगिरीने सर्वांनाच चकित केले आहे.
हेही वाचा - भारत वि. इंग्लंड : चेन्नईतील कसोटी सामन्यांसाठी प्रेक्षकांना डावलले
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून सिराज गुरुवारी आपल्या मूळ गावी हैदराबादला परतला. हैदराबाद गाठल्यावर सिराजने आपल्या वडिलांच्या कबरीचे दर्शन घेतले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना सिराजच्या वडिलांचे निधन झाले. कठोर कोरोनाच्या प्रोटोकॉलमुळे आणि देशाप्रति असलेल्या प्रेमामुळे आणि सिराज संघासोबत थांबला. ब्रिस्बेन येथे खेळल्या गेलेल्या अखेरच्या कसोटी सामन्यात राष्ट्रगीत सुरू असताना सिराज भावनिक झाला. याच सामन्याच्या एका डावात सिराजने पाच बळी घेत वडिलांना मानवंदना दिली.
सिराजचे वडील मोहम्मद गौस पेशाने ऑटोरिक्षा चालक होते. आपल्या मुलाला यशस्वी क्रिकेटपटू बनवण्यासाठी गौस यांनी परिश्रम घेतले. "माझा मुलगा देशाचे नाव उज्ज्वल करेल अशी माझ्या वडिलांची नेहमीच इच्छा होती. माझ्यासाठी हा मोठा धक्का आहे. माझा आधार हरवला आहे. मी देशाकडून खेळावे असे त्यांचे स्वप्न होते", असे सिराज म्हणाला.
भारतीय संघाने रचला इतिहास
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात ३ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह भारताने बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत २-१ ने बाजी मारली. भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीने वैयक्तिक कारणास्तव पहिल्या कसोटी सामन्यानंतर मालिकेतून माघार घेतली. त्यानंतर प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाले, अशा कठीण परिस्थितीत अजिंक्यने मोठ्या कौशल्याने सहकाऱ्यांना सोबत घेऊन एकजुटीने कांगारूंचा सामना केला आणि इतिहास घडवला.