मुंबई - भारतीय वेगवान गोलंदाज श्रीशांतने मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करणार असल्याचे सांगितले आहे. एका अॅपवर लाईव्ह येत श्रीशांतने ही घोषणा केली. श्रीशांत गेल्या काही काळापासून चित्रपट सृष्टीत आपले स्थान मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.
श्रीशांतने सांगितले, की आतापर्यंत मी ज्या भूमिका केल्या आहेत, त्यापैकी ही सर्वोत्तम भूमिका असणार आहे. या मराठी चित्रपटाचे नाव 'मुंबईचा वडापाव' आहे. या चित्रपटाची शुटींग पुणे आणि नाशिकमध्ये होण्याची शक्यता आहे.
या चित्रपटात श्रीशांतसोबत मल्याळम आणि मराठी चित्रपटसृष्टीतील काही प्रसिद्ध कलाकारही दिसण्याची शक्यता आहे. क्रिकेट कारकीर्द थांबल्यानंतर 2017 मध्ये श्रीशांत 'अक्सर 2' या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. तसेच श्रीशांतने लोकप्रिय 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोमध्येही सहभाग घेतला होता.
श्रीशांत टी-20 आणि एकदिवसीय विश्वचषक जिंकणार्या भारतीय संघाचा सदस्य होता. 2011 वर्ल्ड कपपासून तो भारताकडून खेळलेला नाही. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बंदीतून श्रीशांत 13 सप्टेंबर 2020 ला सुटका होणार आहे. 2005 मध्ये श्रीशांतने श्रीलंकेविरुद्ध नागपूर येथे एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 2006 मध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. 27 कसोटीत त्याने 87 तर 53 एकदिवसीय सामन्यात त्याने 75 विकेट्स घेतल्या आहेत.