हॅमिल्टन - ऑस्ट्रेलियात नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-२० विश्व करंडक स्पर्धेच्या दृष्टीने, जगातील सर्वच संघांनी आतापासूनच तयारीला सुरूवात केली आहे. भारतीय संघाचीही बांधणी या दृष्टीने केली जात आहे. या स्पर्धेआधी भारतीय संघाला सराव म्हणून फार कमी सामने मिळणार आहेत. पण भारतासाठी आयपीएल स्पर्धा सरावासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. वर्षाच्या सुरुवातीला भारताने श्रीलंकेवर टी-२० मालिकेत २-० ने मात केली. यानंतर भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर गेला आहे. या दौऱ्यातील टी-२० मालिकेत भारताने २-० अशी आघाडी घेतली आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना उद्या ( बुधवार ) होत आहे. या सामन्याआधी भारतीय संघाचे फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी आगामी विश्व करंडक स्पर्धेसंदर्भात एक मोठी घोषणा केली आहे.
विक्रम राठोड म्हणाले, की 'भारतीय क्रिकेटमधील नव्या पिढीची कामगिरी अविश्वसनीय अशी आहे. आगामी आयसीसी टी-२० विश्व करंडक स्पर्धेसाठी महत्त्वाच्या खेळाडूंची निवड जवळपास झाल्यातच जमा आहे. संघ कसा असेल याबाबत आम्हाला माहिती आहे. फक्त दुखापतींची चिंता आम्हाला आहे. पण, संघ निवडीची प्रक्रिया अखेरच्या क्षणापर्यंत सुरू असेल.'
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन्ही सामन्यात केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी चांगली कामगिरी केली. भारताच्या विजयात या दोघांची महत्त्वाची भूमिका होती. यांना अधिक संधी मिळाली तर ते सामना जिंकून देतात, असेही राठोड म्हणाले. ऑकलंडच्या तुलनेत हॅमिल्टन, वेलिंग्टन आणि माउंट मानगानुईचे मैदान मोठे आहेत. असे असले तरी विजयी संघात बदल होणार नसल्याचे, त्यांनी स्पष्ट केलं आहे.
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्व करंडक स्पर्धेआधी भारतीय संघात वेगवेगळे प्रयोग करण्यात येत आहेत. यात जास्तीज जास्त युवा खेळाडूंना संधी देण्यात येत आहेत. त्यात श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर आणि शिवम दुबे या सारख्या खेळाडूंना संधी देण्यात आली. भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये चांगली कामगिरी करत असून सर्व खेळाडूंनी संघाच्या यशात महत्त्वाचे योगदान दिले आहे.
हेही वाचा - कॅप्टन कोहलीचा खतरनाक स्टंट, पाहा व्हिडिओ
हेही वाचा - यंदाच्या आयपीएल स्पर्धेत 'हे' दोन नवीन नियम होणार लागू