हैदराबाद - भारत आणि वेस्ट इंडीज संघात उद्या (शुक्रवार दि.६) पासून ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये रंगणार आहे. दरम्यान, या मालिकेत आयसीसीच्या वतीने एक मोठा बदल करण्यात आला आहे.
आता फ्रंट फूटचा नो-बॉल तिसरे पंच देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त वाद हे नो बॉलवरून होतात. त्यामुळे या वादावर तोडगा म्हणून नियम आणला आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यात पंचांच्या चुकांना टाळण्यासाठी आता फ्रंट फूट नो-बॉलवर लक्ष ठेवण्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार आहे.
बऱ्याच वेळा मैदानावरील पंचांकडून फ्रंट फूट नो-बॉल पाहताना चूक होते. त्यामुळे आता आयसीसीच्या वतीने टीव्ही पंचांकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ६ डिसेंबरपासून भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत हा प्रयोग करण्यात येणार असल्याचे आयसीसीच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, याआधी इंग्लंड-पाकिस्तान यांच्यात तिसऱ्या पंचांनी सराव म्हणून 'हॉकआय ऑपरेटर'ची मदत घेतली होती.
दरम्यान, यासंदर्भात आयसीसीने एक मजकूर जारी केला आहे. त्या मजकुरात त्यांनी भारत-वेस्ट इंडीज यांच्यात फ्रंट फूट नो-बॉलचे काम तिसऱ्या पंचांकडून कसे होते, ते पाहिले जाईल. या पध्दतीचा सराव म्हणून याची मदत घेतली जाणार आहे. यासाठी तिसरे पंच मैदानावरील मुख्य पंचांशी चर्चा करतील. मात्र, मैदानावरील पंच याबाबत निर्णय देणार नाहीत. तो अधिकार फक्त तिसऱ्या पंचांकडे असणार आहे, असं सांगितलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वाद कमी करण्यासाठी आयसीसीकडून नवे नियम लागू करण्यात येत आहे.
हेही वाचा - टी-२० विश्व करंडकासाठी टीम इंडियात फक्त एक गोलंदाजाची जागा शिल्लक - विराट
हेही वाचा - पंत की सॅमसन, कर्णधार कोहलीने दिली 'या' नावाला पसंती