नवी दिल्ली - टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या पाठीच्या दुखण्याने त्रस्त होता. त्यामुळे त्याच्यावर इंग्लंडमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या पांड्या संघाबाहेर असल्याने त्याच्या ठिकाणी युवा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेला संघात एन्ट्री मिळाली. ६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडीज विरुध्दच्या टी-२० मालिकेसाठी शिवम टीम इंडियात आहे. संघात समावेश झाल्यानंतर शिवमने हार्दिकची जागा घेणे हा माझा हेतू नसून माझा हेतू फक्त देशासाठी खेळणे आहे, असे सांगितले.
मुंबईचा युवा अष्टपैलू खेळाडू शिवमने आतापर्यंत ३ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, हे तीनही सामने त्याने बांगलादेशविरुध्द खेळले आहेत. यात शिवमने गोलंदाजीतील ३० धावात ३ गडी बाद करत आपले सर्वश्रेष्ठ प्रदर्शन नोंदवले. शिवम अष्टपैलू खेळाडू असून तो मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करण्यात माहीर आहे. यामुळे तो वेस्ट इंडीजविरुध्दच्या टी-२० मालिकेत महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो.
हार्दिकच्या ठिकाणी स्थान मिळाल्यानंतर शिवम म्हणाला की, 'मला मिळालेली संधी ही हार्दिकची जागा काबीज करण्यासाठी नाही तर देशासाठी चांगले प्रदर्शन करून दाखवण्यासाठी आहे. मी चांगले प्रदर्शन करण्यासाठी प्रयत्न करेन.'
संघातील सहकारी खेळाडू माझा उत्साह वाढवत आहेत. तसेच कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाकडूनही मला सहकार्य मिळत आहे. यामुळे माझा आत्मविश्वास वाढला असल्याचेही शिवमने सांगितले. दरम्यान, वेस्ट इंडीज विरुध्दच्या टी-२० मालिकेला ६ डिसेंबरला सुरुवात होणार असून पहिला सामना हैदराबादच्या मैदानावर रंगणार आहे.
हेही वाचा - धोनी के आवाज में पेश है, जब कोई बात बिगड जाए...व्हिडिओ मात्र स्वतःच्या रिस्कवर पाहा
हेही वाचा - धावपटू योहान ब्लॅक केकेआर, आरसीबी संघाकडून आयपीएल खेळण्यासाठी इच्छुक