मुंबई - भारत आणि वेस्ट इंडीज संघात तिसरा आणि अखेरचा निर्णायक टी-२० सामना वानखेडे मैदानावर आज खेळवण्यात येणार आहे. या सामन्याआधी वानखेडेचा इतिहास पाहता वेस्ट इंडीजने या मैदानावर एकही सामना गमावलेला नाही. तर दुसरीकडे भारतीय संघाची कामगिरी या मैदानावर चांगली झालेली नाही.
वानखेडे मैदानावर वेस्ट इंडीजने आतापर्यंत २ टी-२० सामने खेळले आहेत. यात दोनही सामन्यात विंडीजने विजय मिळवला आहे. विंडीजने पहिला सामना २०१६ च्या विश्व करंडक स्पर्धेत इंग्लंडविरुध्द खेळला. हा सामना त्यांनी ६ गडी राखून जिंकला. तर दुसरा सामना भारताविरुध्द खेळला. हा सामनाही विंडीजने ६ गडी राखून जिंकला. महत्वाची बाब म्हणजे, भारताविरुध्दचा सामना हा विश्व करंडक स्पर्धेचा उपांत्य फेरीचा सामना होता. हा सामना जिंकत विंडीजने अंतिम फेरी गाठली होती.
दुसरीकडे भारतीय संघाने वानखेडेवर ३ टी-२० सामने खेळले आहेत. यात भारतीय संघाला फक्त एकच विजय मिळवता आला आहे. भारतीय संघाने या मैदानावर इंग्लंड, वेस्ट इंडीज आणि श्रीलंका विरुद्ध सामने खेळले आहेत. यात भारतीय संघ २४ डिसेंबर २०१७ ला श्रीलंकेविरुध्दचा सामना ५ गडी राखून जिंकला. तर इंग्लंड आणि वेस्ट इंडीज संघाकडून भारताला पराभव पत्कारावा लागला आहे.
हेही वाचा - भारत वि. विंडीजमध्ये वानखेडेवर आज निर्णायक टी-२० लढत.. मालिकाविजयासाठी दोन्ही संघ सज्ज
हेही वाचा - 'मी धोनीला चांगला ओळखतो, तो कधीही स्वतःला संघावर थोपवणार नाही'