चेन्नई - भारत आणि वेस्ट इंडीज संघात एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना एमए चिदंबरम स्टेडियममध्ये रंगला आहे. विंडीज कर्णधार केरॉन पोलार्डने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा भारतीय कर्णधार विराट कोहली जाम खूश झाल्याचे दिसून आले.
चेन्नईची खेळपट्टी पाहता नाणेफेक जिंकल्यास प्रथम फलंदाजी करणे योग्य ठरेल, असे सांगण्यात येत होते. मात्र, नाणेफेक विंडीजच्या पारड्यात गेला. तेव्हा कर्णधार पोलार्डने घेतलेला गोलंदाजीचा निर्णय ऐकून शेजारी उभा असलेला कोहलीला भलताच आनंदी झाला.
नाणेफेक झाल्यानंतर विराट म्हणाला, 'मलाही नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजीच करायची होती. चेन्नईच्या वातावरणात रात्रीच्या सत्रात फलंदाजी करणे अवघड ठरते. ही खेळपट्टी 'ड्राय' आहे. त्यामुळे पोलार्डच्या गोलंदाजीच्या निर्णयाने मी आश्चर्यचकीत झालो आहे.'
भारतीय संघ वेस्ट इंडीज विरुध्दच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत विजयाचा प्रबळ दावेदार आहे. आज उभय संघात पहिला सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये रंगला आहे. विराट सेनेचे सलग दहाव्या एकदिवसीय मालिकेत विजय मिळवण्याचे ध्येय असून यासाठी संघ विजयी सुरूवात करण्यासाठी उत्सुक आहे.
भारतीय संघ -
रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार ), श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केदार जाधव, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, दीपक चाहर, कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी.
वेस्ट इंडीज संघ -
सुनील एंब्रिस, शाई होप (यष्टीरक्षक), शिमरोन हेटमायर, रोस्टन चेज, निकोलस पूरन, केरॉन पोलार्ड (कर्णधार), जेसन होल्डर, शेल्डन कॉटरेल, कीमो पॉल, हेडेन वॉल्श आणि अल्जारी जोसेफ.