चेन्नई - भारत आणि वेस्ट इंडीज संघात आजपासून तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये पहिला सामना रंगणार आहे. मात्र, या सामन्यावर पावसाचे सावट आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघ विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. कॅरेबियन संघाविरुद्ध सलग दहावी द्विपक्षीय मालिका जिंकण्याकडे कोहली आणि कंपनीची नजर असणार आहे.
भारतीय संघाला दुखापतीचा फटका -
वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि सलामीवीर फलंदाज शिखर धवन यांची उणीव भारतीय संघाला जाणवणार आहे. दोघेही जखमी झाल्याने संघाबाहेर आहेत. भुवनेश्वरच्या ठिकाणी शार्दुल ठाकूर आणि शिखरच्या जागेवर मयांक अग्रवालला संघात जागा मिळाली आहे.
पावसाचे सावट -
चेन्नईत मागील २४ तासात पाऊस सुरू आहे. यामुळे या सामन्यावर पावसाचे सावट आहे. रात्रभर झालेल्या पावसामुळे मैदान निसरडे झाले. यामुळं खेळाडूंनी सराव केला नाही.
एकदिवसीय मालिकेत सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांच्याकडे संघाला चांगली सुरुवात करुन देण्याची मोठी जबाबदारी असेल. श्रेयस अय्यर देखील संधीचा लाभ घेण्यात यशस्वी ठरल्यामुळे त्याला चौथ्या स्थानावर खेळण्याची संधी मिळू शकते. गेल्या काही महिन्यांपासून अपयशी ठरलेला यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतच्या कामगिरीकडेही नजर असणार आहे.
गोलंदाजीत वेगवान माऱ्याची धुरा मोहम्मद शमी आणि दीपक चहरकडे असेल, तर युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्या फिरकी जोडीला चेन्नईच्या खेळपट्टीवर एकत्र संधी मिळेल का, याकडेही जाणकारांचे लक्ष आहे.
दुसरीकडे शिमरोन हेटमायर, निकोलस पूरन, अष्टपैलू रोस्टन चेज, कर्णधार केरॉन पोलार्ड यांच्यावर धावा काढण्याची, तर शेल्डन कॉटरेल, हेडन वॉल्श या गोलंदाजांवर भारताच्या फलंदाजांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असेल.
- भारताचा संभाव्य संघ -
- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, शिवम दुबे, केदार जाधव, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चाहर, मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर.
- वेस्ट इंडीजचा संभाव्य संघ -
- केरॉन पोलार्ड (कर्णधार), सुनील अंबरीश, शाय होप, केरी पियरे, रोस्टन चेस, अल्झारी जोसेफ, शेल्डन कॉटरेल, ब्रँडन किंग, निकोलस पूरन, शिमरोन हेटमायर, एव्हिन लुईस, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, कीमो पॉल आणि हेडन वाल्श ज्युनियर.