मुंबई - दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने आज (गुरुवारी) टीम इंडियाची घोषणा केली. यात बीसीसीआयने खराब फॉर्मात असलेल्या लोकेश राहुलला घरचा रस्ता दाखवला आणि युवा शुभमन गिलला संघात घेतले. राहुलला वगळल्याने हिटमॅन रोहित शर्माचा कसोटीमध्ये सलामीला खेळण्याच्या मार्ग मोकळा झाला आहे. निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी याची पुष्टी केली आहे.
वेस्ट इंडिज दौऱ्यावर रोहितचा कसोटी संघात समावेश असून देखील त्याला दोन्ही सामन्यात अंतिम ११ मध्ये संधी देण्यात आली नाही. या मालिकेत डावाची सुरुवात केएल राहुल आणि मयंक अग्रवालच्या जोडीने केली. पण केएल राहुलला या मालिकेच्या ४ डावांमध्ये १०१ धावा करता आल्या. तसेच राहुलने कसोटीमधील मागील १२ डावांमध्ये एकच अर्धशतक झळकवले आहे. यामुळे आफ्रिकेविरुध्दच्या मालिकेत राहुलला डच्चू मिळणार, याचे संकेत निवड समितीचे प्रमुख एसएमके प्रसाद यांनी अगोदरच दिले होते.
एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत प्रसाद यांनी सांगितले होते की,'वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर निवड समिती सदस्यांची अद्याप बैठक झालेली नाही. पण जेव्हा होईल, त्यावेळी रोहितचा कसोटीतही सलामीवीर म्हणून विचार केला जावा, या विषयावर चर्चा नक्की केली जाईल.'
या मताप्रमाणेच प्रसाद यांनी चर्चा घडवून आणली आणि रोहितची सलामीवीर म्हणून वर्णी लागली. दरम्यान, रोहित शर्माने २७ कसोटी सामन्यांत ३९.६२ च्या सरासरीने १५८५ धावा केल्या आहेत. महत्वाचे म्हणजे त्याने या धावा खालच्या क्रमाकांवर खेळत केल्या आहेत.