बंगळुरु - कर्णधार क्विंटन डी कॉकच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने अखेरच्या टी-२० सामन्यात भारतावर ९ गडी राखून विजय मिळवला. या पराभवाबरोबर भारताचे मालिका जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. भारताने दिलेले १३५ धावांचे आव्हान आफ्रिकेने १७ षटकात सहज पूर्ण केले. डी-कॉकने नाबाद ७९ धावा करत संघाला विजय मिळवून दिला.
आफ्रिकेचे सलामीवीर डी-कॉक आणि हेंड्रिग्ज यांनी आफ्रिकेला आश्वासक सुरुवात करून दिली. दोघांनीही पहिल्या गडीसाठी ७६ धावांची भागीदारी केली. भारतीय गोलंदाजांचा समाचार दोघांनी घेतला. हेंड्रिग्ज हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर २८ धावांवर बाद झाला. यानंतर डी-कॉक आणि टेंम्बा बावुमा याने संघाला एकतर्फी विजय मिळवला.
या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत भारतीय संघाला १३४ धावांवर रोखलं होते.
भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी भारतीय डावाची सुरुवात आक्रमक केली. मात्र रोहित शर्मा ब्युरेन हेंड्रिग्जच्या गोलंदाजीवर अवघ्या ९ धावांवर माघारी परतला. दुसऱ्या बाजूने शिखर धवनने संघाची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. आफ्रिकेच्या गोलंदाजांचा समाचार घेत शिखरने २५ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ३६ धावा केल्या. मात्र तोही तबरेज शम्सीच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद होऊन माघारी परतला.
दुसरीकडे कर्णधार विराट कोहलीने संथ खेळी केली. तो वेगाने धावा जमवण्याच्या उद्देशात असताना त्याला रबाडाने बाद केले. विराटने १५ चेंडूत ९ धावा केल्या. यानंतर श्रेयस अय्यर, कृणाल पांड्या आणि ऋषभ पंत यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र फोर्टेनने एकाच षटकात दोघांचा बळी घेत भारताला अडचणीत आणले. अखेर रविंद्र जाडेजा आणि हार्दिक पांड्याने भारताला १३४ धावांचा टप्पा गाठून दिला. आफ्रिकेकडून कगिसो रबाडाने ३, फोर्टेन, आणि ब्युरेन हेंड्रिग्जने २ तर तबरेज शम्सीने १ बळी घेतला.