मुंबई - हॅमिल्टन, ऑकलंड आणि माउंट माउंगानुई येथे खेळवण्यात आलेल्या ३ एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत यजमान न्यूझीलंड संघाने भारतीय संघाला ३-० ने धूळ चारली. भारतीय संघावर तब्बल ३१ वर्षांनी व्हाईटवॉशची नामुष्की ओढवली. भारतीय संघाचा या मालिकेत दारुण पराभव का झाला, यामध्ये प्रामुख्याने ५ कारणे सांगता येतील. वाचा कोणती आहेत ती कारणे...
सलामी जोडीचे अपयश -
शिखर धवन दुखापतीमुळे संपूर्ण न्यूझीलंड दौऱ्यातून बाहेर पडला. त्यानंतर रोहित शर्मा टी-२० मालिकेच्या पाचव्या सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झाला. तेव्हा त्याने एकदिवसीय मालिकेतून माघार घेतली. यामुळे भारतीय संघाला एकदिवसीय मालिकेत पृथ्वी शॉ आणि मयांक अगरवाल या नव्या सलामीवीर जोडीसह उतरावे लागले. ही जोडी पहिल्या एकदिवसीय सामन्यात अर्धशतकी सलामी देऊ शकली. त्यानंतरच्या दोन्ही सामन्यात भारताला आश्वासक सुरूवात मिळाली नाही.
विराट कोहली फलंदाजीत सुपरफ्लॉप -
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत अपयशी ठरला. त्याने पहिल्या एकदिवसीय सामन्यात अर्धशतक झळकावले. पण त्यानंतरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात तो स्वस्तात बाद झाला. विराटने तीन सामन्यात २५ च्या सरासरीने ७५ धावा केल्या.
भारताची खराब गोलंदाजी -
भारतीय गोलंदाजांनी एकदिवसीय मालिकेत स्वैर मारा केला. खासकरुन शार्दुल ठाकूरने तीन सामन्यात ७.९७ च्या इकॉनामी रेटने तब्बल २२२ धावा दिल्या. याशिवाय दुखापतीतून सावरल्यानंतर संघात वापसी केलेला भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहला तीन सामन्यात एकही गडी टिपता आला नाही. नवदीप सैनी, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांनीही ६ हून अधिकच्या इकॉनामीने धावा दिल्या.
गचाळ क्षेत्ररक्षणाचा फटका -
एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाने गचाळ क्षेत्ररक्षण केले. पहिला सामन्यात भारतीय संघाने ३४७ धावा धावफलकावर लावल्या. तरीही भारताने हा सामना क्षेत्ररक्षणामुळे गमावला. कुलदीप यादवने या सामन्यात अनुभवी रॉस टेलरचा झेल १० धावांवर सोडला. त्यानंतर त्याने शतकी खेळी करत न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. विराट कोहलीने केलेले धावबाद सोडल्यास भारताचे क्षेत्ररक्षण गचाळ ठरले.
संघ निवडीत चूक -
शार्दुल ठाकूर खराब फॉर्मात असताना त्याला विराट कोहलीने तिन्ही सामन्यात खेळवले. शार्दुलने २२२ धावा दिल्या. ऋषभ पंतला एकही सामन्यात संधी मिळाली नाही. तर फॉर्मात असलेल्या मनीष पांडे तिसऱ्या सामन्यात संधी मिळाली.