ख्राईस्टचर्च - पहिल्या डावात अपयशी ठरल्यानंतर दुसऱ्या डावातही भारताची घसरगुंडी उडाली आहे. न्यूझीलंडला पहिल्या डावात २३५ धावांत रोखल्यानंतर, भारताने फलंदाजीला प्रारंभ केला. दुसऱया दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने ६ बाद ९० धावांपर्यत मजल मारली असून त्यांच्याकडे ९७ धावांची आघाडी आहे.
हेही वाचा - 'खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स'मध्ये द्युती चंदला सुवर्ण
ख्राईस्टचर्चवर सुरू असलेल्या न्यूझीलंडविरूद्धच्या दुसऱया कसोटीच्या दुसऱया डावातही भारताने निराशा केली. पहिल्या डावात अर्धशतक झळकावणारा सलामीवीर पृथ्वी शॉ १४ तर, दुसरा सलामीवीर मयांक अग्रवाल ३ धावांवर माघारी परतला. त्यानंतर आलेला भारताचा अनुभवी आणि भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने प्रतिकार केला. पण, त्याला २४ धावांवर बोल्टने बाद केले. खराबव फॉर्मशी झुंजत असलेला कर्णधार विराटलाही ग्रँडहोमेने १४ धावांवर पायचित पकडले. खेळ संपला तेव्हा हनुमा विहारी ५ तर, यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत १ धावावर खेळत होता. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने सर्वाधिक तीन बळी घेतले. तर, साऊदी, जेमिसन आणि वॅगनरने प्रत्येकी एक बळी घेतला.
तत्पूर्वी, न्यूझीलंडने पहिल्या डावात सर्वबाद २३५ धावा केल्या. दुसऱया दिवशी न्यूझीलंडने आपला डाव ६३ धावांवरुन पुढे खेळण्यास सुरूवात केली. तेव्हा भारतीय वेगवान माऱ्यासमोर न्यूझीलंडची अवस्था ४७ षटकात ५ बाद १३७ अशी झाली. उमेश यादवने भारताला पहिले यश मिळवून दिले. त्याने सलामीवीर टॉम ब्लंडेलला ३० धावांवर पायचित केले. तेव्हा जसप्रीत बुमराहने केन विल्यमसनला बाद करत भारताला मोठे यश मिळवून दिले. ३ धावांवर विल्यमसनचा झेल ऋषभ पंतने घेतला. यानंतर अनुभवी रॉस टेलर जम बसू लागला होता. तेव्हा त्याला रवींद्र जडेजाने माघारी धाडले. टेलरचा (१५) झेल उमेश यादवने टिपला. यादरम्यान सलामीवीर टॉम लॅथमने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याचा अडथळा शमीने दूर केला. लॅथमने ५ चौकाराच्या मदतीने ५२ धावा केल्या. लॅथम पाठोपाठ शमीने हेन्री निकोलसला (१४) पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
दरम्यान न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तेव्हा भारतीय संघाचा पहिला डाव २४२ धावांवर आटोपला. सलामीवीर पृथ्वी शॉ (५४), चेतेश्वर पुजारा (५४) आणि हनुमा विहारी (५५) यांनी अर्धशतके झळकावली. तिघे वगळता भारताचे अन्य फलंदाज स्वस्तात बाद झाले.