अहमदाबाद - इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात विराटने त्याचा धावांचा दुष्काळ संपवत नाबाद ७३ धावांची ताबडतोड खेळी केली. या सामन्यात त्याने टी-२० क्रिकेटमध्ये ३ हजार धावांचा टप्पा पार केला. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये आतापर्यंत जगातील कोणत्याही फलंदाजाला हे मानाचे स्थान मिळवता आलेले नाही.
विराट कोहलीने ७२ टी-२० सामने खेळत ३ हजार धावांचा टप्पा पार केला. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये विराटने २६ अर्धशतके झळकावली आहेत. यादरम्यान, त्याने ८४ षटकारही ठोकले आहेत.
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये विराटनंतर सर्वाधिक धावा न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गुप्टिलने केल्या आहेत. तो या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. गुप्टिलच्या पाठोपाठ भारताचा 'हिटमॅन' रोहित शर्माचा नंबर लागतो. गुप्टिलने २ हजार ८३९ धावा केल्या आहेत तर रोहित शर्माच्या नावे २ हजार ७७३ धावा आहेत.
दरम्यान, इंग्लंडने दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघासमोर विजयासाठी १६५ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान भारतीय संघाने ३ गड्याच्या मोबदल्यात १७.५ षटकात पूर्ण केले. या सामन्यात इशान किशनने सलामीला येत ३२ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांसह ५६ धावांची दमदार खेळी केली. यानंतर विराटने नाबाद ७३ धावा करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारतीय संघाने या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. उभय संघातील तिसरा सामना १६ तारखेला होणार आहे.
हेही वाचा - इशानच्या दमदार खेळीत आहे रोहितचा वाटा; खुद्द किशनने केलं कबूल
हेही वाचा - ४९ चेंडूत नाबाद ७३ रन्स : विराट म्हणाला, 'या' खेळाडूशी चर्चा केल्याने सूर गवसला