अहमदाबाद - भारतीय संघाचा हिटमॅन सलामीवीर रोहित शर्मा इंग्लंडविरुद्धचे पहिले दोन सामने खेळू शकला नाही. त्याला विश्रांती देण्यात आली होती. पण संघाबाहेर बसून रोहितने भारतीय संघात पदार्पण करणाऱ्या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढविण्याचे काम केले. खुद्द इशान किशनने याबाबत खुलासा केला.
इशान किशनला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली. त्याने या संधीचे सोने करताना पदार्पणाच्या सामन्यात तडाकेबाज अर्धशतक झळकावले. या कामगिरीमुळे त्याला सामनावीरच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. सामना संपल्यानंतर झालेल्या व्हर्चुअल पत्रकार परिषदेत बोलताना किशन म्हणाला की, 'एक क्रिकेटपटू म्हणून तुमच्या पाठीशी अनेक लोक असतात की जे तुम्हाला मदत करत असतात. रोहितने सामना सुरू होण्याआधी मला सांगितलं होते की, तुला सलामीला फलंदाजी करायची आहे आणि आयपीएलमध्ये जसे मोकळेपणाने खेळतोस तसाच आजही खेळ.'
मी ज्यावेळी मैदानात गेलो तेव्हा दबाव वाटणे सहाजिक होते. पण जेव्हा तुम्ही राष्ट्रध्वज पाहता आणि देशाची जर्सी परिधान करता तेव्हा तुम्ही सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करता. मी तेच केले, असे देखील किशनने सांगितले.
दुसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडने भारतीय संघासमोर विजयासाठी १६५ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान भारतीय संघाने ३ गड्याच्या मोबदल्यात १७.५ षटकात पूर्ण केले. या सामन्यात इशान किशनने सलामीला येत ३२ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारासह ५६ धावांची दमदार खेळी केली. यानंतर विराटने नाबाद ७३ धावा करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारतीय संघाने या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. उभय संघातील तिसरा सामना १६ तारखेला होणार आहे.
हेही वाचा - भावा जिंकलस! इशानने सामनावीरचा पुरस्कार 'या' व्यक्तीला केला समर्पित
हेही वाचा - Just Married: जसप्रीत-संजना यांच्या नव्या इनिंगसाठी आयसीसीसह क्रीडा विश्वातून शुभेच्छांचा वर्षाव