चेन्नई - भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार कसोटी सामन्याच्या मालिकेतील पहिले दोन कसोटी सामने चेन्नईमध्ये खेळवण्यात येणार आहेत. हे सामने विनाप्रेक्षक होणार आहेत. याची स्पष्टोक्ती तमिळनाडू क्रिकेट संघटनेने दिली आहे.
कोरोनाच्या साथीमुळे बीसीसीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार चेपॉकवरील दोन कसोटी सामन्यांना प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही, असे संघटनेचे सचिव आर. एस. रामास्वामी यांनी सांगितले आहे. बीसीसीआयने २० जानेवारीला पाठवण्यात आलेल्या परिपत्रकानुसार सामने बंदिस्त स्टेडियमवर होणार असून, प्रेक्षकांना मज्जाव करण्यात आला आहे.
केंद्र सरकारने क्रीडा स्पर्धांसाठी स्टेडियम व क्रीडा संकुलात ५० टक्के प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. पण, बीसीसीआय आणि तमिळनाडू क्रिकेट संघटनेने सर्वांच्याच आरोग्याच्या दृष्टीने पहिले दोन्ही सामने विनाप्रेक्षक खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मैदानावर जाऊन पाहण्यासाठी प्रेक्षकांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
दरम्यान, इंग्लंडचा संघ श्रीलंकेचा दौरा आटोपून २७ जानेवारी रोजी चेन्नईत दाखल होईल. यानंतर उभय संघातील पहिला सामन्याला ५ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. तर दुसरा सामना १७ फेब्रुवारीपासून खेळला जाईल.
हेही वाचा - PAK VS SA : दक्षिण आफ्रिकेचा पाकिस्तान दौरा, जाणून घ्या हेड टू हेड रेकॉर्ड
हेही वाचा - IPL २०२१ : राजस्थान रॉयल्स संघात संगकाराची एन्ट्री; मिळाली 'ही' जबाबदारी