राजकोट - भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी-20 मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात भारताने सहज विजय मिळवला. बांगलादेशने दिलेले 154 धावांचे आव्हान भारताने आठ गडी राखून तसेच 16 व्या षटकारातच पूर्ण केले. भारताचा कर्णधार रोहित शर्माने ताबडतोब फलंदाजी करत 85 धावा केल्या. या विजयामुळे भारताने टी-20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. रोहित शर्मा सामनावीर ठरला.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशने फलंदाजीची अतिशय सावध सुरुवात केली. लिटोन दास आणि मोहम्मद नईम या सलामीवीरांनी बांगलादेशची पकड मजबूत केली होती. मात्र, पंतने दासला 29 धावांवर धावबाद केल्याने सलामी जोडी तुटली. त्यानंतर लगेच नईमदेखील 36 धावांवर झेलबाद झाला. त्याचप्रमाणे सौम्या सरकार 30 धावा आणि मोहमुदुल्लाहच्या 30 धावांच्या मदतीने बांगलादेश 153 धावांपर्यंत मजल मारू शकला. भारताकडून चहलने दोन, दिपक चहर, खलील अहमद आणि वाशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
भारताचा सलामीवीर कर्णधार रोहित शर्मा व शिखर धवनने आक्रमक सुरुवात केली. रोहित-धवनने शतकी सलामी करत भारताच्या विजयाला मजबूत केले. रोहित शर्माने सहा षटकार आणि सहा चौकारांच्या मदतीने 43 चेंडूमध्ये 85 धावा काढल्या. तर शिखर धवनने सहा चौकारांच्या साहाय्याने 31 धावा काढत रोहितला साथ दिली. त्यानंतर लोकेश राहुल 8 धावा आणि श्रेयस अय्यरने 24 धावा काढत विजयाची औपचारिकता पूर्ण केली. बांगलादेशकडून अमिनूल इस्लामने चार षटकामध्ये 29 धावा देत दोन बळी घेतले.