राजकोट - वानखेडेवरील मानहानिकारक पराभवानंतर, टीम इंडिया आता पलटवार करण्यासाठी सज्ज झाली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज (शुक्रवारी) दुसरा एकदिवसीय सामना राजकोट येथे रंगणार आहे. हा सामना दुपारी १.३० वाजता सुरू होईल.
हेही वाचा - बीसीसीआयच्या करार यादीतून धोनीचे नाव 'कटाप'
पहिल्या सामन्यात पाहुण्यांनी भारताला दहा गड्यांनी मात दिली. चौथ्या क्रमांकावर उतरण्याची कर्णधार विराट कोहलीची योजना मुंबईत अयशस्वी ठरली. त्यामुळे राजकोटला होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मालिकेतील आव्हान टिकवण्याच्या निर्धाराने कोहली त्याच्या नियमित तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरू शकेल. सचिन तेंडुलकरच्या मायदेशात सर्वाधिक शतके झळकावण्याच्या विक्रमाची बरोबरी साधण्यासाठी कोहलीला एका शतकाची आवश्यकता आहे.
रिषभ पंतला दुखापत झाल्यामुळे यष्टिरक्षणाची जबाबदारी राहुलकडे सोपवली जाणार आहे. तसेच मंगळवारी मुंबईत झालेल्या सामन्यात गोलंदाजांना एकही बळी घेता आला नाही, त्यामुळे आजच्या सामन्यात त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
दुसरीकडे भारत दौऱ्यावर आलेला ऑस्ट्रेलिया संघ सर्वच बाजूंनी बलाढ्य वाटत आहे. पहिल्या सामन्याप्रमाणे स्टार्क आणि कमिन्सवर भारतीय फलंदाजांना वेसण घालण्याची जबाबदारी असणार आहे. तर, वॉर्नर, फिंच, स्मिथ, लाबुशेन हे फलंदाज संघासाठी महत्वाची भूमिका पार पाडू शकतात.
संघ -
भारत - विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, केदार जाधव, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, यजुर्वेद्र चहल, कुलदीप यादव, नवदीप सैनी, जसप्रित बुमरा, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी.
ऑस्ट्रेलिया - अॅरोन फिंच (कर्णधार), अॅलेक्स केरी (यष्टिरक्षक), पॅट्रिक कमिन्स, अॅश्टॉन अगर, पीटर हँड्सकोम्ब, जोश हॅझलवूड, मार्नस लबूशेन, केन रिचर्ड्सन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, अॅश्टॉन टर्नर, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झम्पा.