सिडनी - भारतीय संघाने तिसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसाअखेर २ बाद ९६ धावा केल्या. त्याआधी ऑस्ट्रेलियाने स्टिव्ह स्मिथच्या झुंजार अर्धशतकी खेळीच्या जोरावर ३३८ धावा जमवल्या.
एकवेळ स्मिथ (२२६ चेंडूंत १३१ धावा) आणि मार्नस लबूशेन (१९६ चेंडूंत ९१ धावा) ही जोडी मैदानात असताना, ऑस्ट्रेलियाचा संघ ४५० हून अधिक धावा करेल असे वाटत होते. पण ही अपेक्षा फोल ठरली. या दोघांनंतर मिचेल स्टार्क (२४) वगळता एकाही फलंदाजाने खेळपट्टीवर फार काळ तग धरता आला नाही. त्यांचा डाव ३३८ धावांत आटोपला. भारताकडून जडेजाने ४ बळी घेत ऑस्ट्रेलियाच्या डावाला सुरुंग लावला. याशिवाय त्याने, दुहेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या स्मिथला धावचीत करीत जडेजाने सामन्याला कलाटणी दिली.
शुक्रवारी पहिल्या दोन सत्रांत ५१ षटकांत ऑस्ट्रेलियाने १७२ धावांची भर घतली, परंतु त्यांचे आठ फलंदाज बाद झाले. जडेजा आणि बुमराह यांनी टिच्चून गोलंदाजी करीत ऑस्ट्रेलियावर दडपण आणले. ऑस्ट्रेलियाचा डाव ३३८ वर आटोपल्यानंतर भारतीय डावात गिलने (१०१ चेंडूंत ५० धावा) कारकीर्दीतील दुसऱ्या कसोटीत पहिले अर्धशतक झळकावले. रोहित आणि गिल या दोघांनी २७ षटकांत ७० धावांची सलामी दिली. दोघे बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणे ५ तर चेतेश्वर पुजारा ९ धावांवर खेळत होते.