नवी दिल्ली - वेस्ट इंडीज संघाला टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत धूळ चारल्यानंतर भारतीय संघ श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया या संघाविरुध्द मालिका खेळणार आहे. नवीन वर्षात होणाऱ्या या मालिकांसाठी आज भारतीय संघाची घोषणा होणार आहे.
सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, निवड समितीची बैठक आज होणार आहे. या बैठकीत भारतीय संघाची घोषणा करण्यात येणार आहे. तसेच जसप्रीत बुमराह आणि दीपक चहर यांच्या फिटनेसवरही बैठीकीत चर्चा होणार असल्याचे समजते.
भारतीय संघ जानेवारी महिन्यात श्रीलंकाविरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे. ५ जानेवारीला या मालिकेची सुरुवात होईल. लंकेविरुद्धच्या मालिकेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात १४ जानेवारीपासून एकदिवसीय सामन्याची मालिका रंगणार आहे.
बुमराहने वेस्ट इंडीजविरुद्धच्या तिसऱया आणि निर्णायक सामन्याआधी भारतीय संघासोबत सराव केला. त्याच्या निवडीबाबतही चर्चा केली जाणार आहे. एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान, प्रसाद यांचा अध्यक्षतेचा कार्यकाल नविन वर्षात संपणार असून बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी नविन निवड समिती गठित करण्याचे संकेत दिले आहेत.
हेही वाचा - IND vs WI : पंत कधी सुधारणार ? निर्णायक सामन्यात सोडले तीन झेल
हेही वाचा - फक्त २ षटकार ठोकून विश्वविजेत्या कर्णधाराला हेटमायरने टाकले मागे