नवी दिल्ली - आगामी आयसीसी विश्वचषक स्पर्धा ३० मे पासून इंग्लंडमध्ये सुरु होणार आहे. या स्पर्धेत क्रिकेट जगतातील पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि भारत १६ जूनला मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफॉर्ड क्रिकेट स्टेडियमवर आमने सामने येणार असून या सामन्याची सर्व तिकिटे ही अवघ्या २ दिवसामध्येच विकली गेली आहेत. या सामन्याची तिकीटे विकत घेणाऱ्यांमध्ये भारतीयांचीच संख्या जास्त आहे.
१४ फेब्रुवारीला पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० पेक्षा जास्त भारतीय सीआरपीएफ जवानांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानशी कोणत्याही पातळीवर क्रिकेट संबंध ठेवू नये अशी जोरदार मागणी होत होती. त्यामुळे विश्वचषकातील भारत-पाक सामन्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेविड रिचर्डस यांच्याकडून यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते की, विश्वचषकातील सर्व सामने हे ठरल्याप्रमाणेच होतील.