ऑकलंड - इडन पार्क मैदानावर खेळल्या गेलेल्या न्यूझीलंडविरूद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने दमदार विजय नोंदवला. आता याच मैदानावरील दुसर्या टी-२० सामन्यासाठी दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने असणार आहेत. पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेमध्ये भारत १-० ने आघाडीवर आहे. त्यामुळे ही आघाडी वाढवण्याचा भारतीय संघाचा मानस असेल. हा सामना दुपारी १२.२० वाजता सुरू होईल.
हेही वाचा - विश्वविजेत्या इंग्लडने केल्या तब्बल ५ लाख धावा!
दुसरीकडे, यजमान न्यूझीलंड संघ आपल्या पहिल्या विजयासाठी प्रयत्नशील असेल. संघातील तिन्ही विभागात सुधारणा आवश्यक असल्याचे यजमान संघाचा कर्णधार केन विल्यमसनने पहिल्या सामन्यानंतर सांगितले होते. आश्वासक धावसंख्या गाठल्यानंतरही या धावसंख्येचा बचाव करण्यात किवी गोलंदाजांना अपयश आले होते.
पहिल्या सामन्यात भारताने फलंदाजीत कमाल केली असली तरी भारतीय गोलंदाज 'महाग' ठरले होते. शार्दुल ठाकुरच्या तीन षटकात ४४ तर, शमीच्या चार षटकात ५३ धावा चोपल्या गेल्या होत्या. त्यामुळे विराट नवदीप सैनीला संघात स्थान देऊ शकतो.
दोन्ही संघातील महत्त्वाचे खेळाडू दुखापतींशी झगडत आहेत. यामध्ये भारताच्या शिखर धवन, हार्दिक पांड्या, दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमार यांचा समावेश आहे. तर यजमान संघाकडून ट्रेंट बोल्ट, मॅट हेन्री आणि लॉकी फर्ग्युसन दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या मालिकेला मुकणार आहेत.
संघ -
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल (यष्टिरक्षक), मनीष पांडे, रिषभ पंत, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, जसप्रित बुमराह, शार्दूल ठाकूर, नवदीप सैनी, वॉशिंग्टन सुंदर.
न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), मार्टिन गप्टिल, रॉस टेलर, स्कॉट कुगेलेइन, कॉलिन मुन्रो, कॉलिन डी ग्रँडहोम, टॉम ब्रूस, डॅरेल मिचेल, मिशेल सँटनर, टिम सेफर्ट (यष्टिरक्षक), हॅमिश बेनेट, इश सोधी, टिम साऊदी, ब्लेअर टिकनर.