नवी दिल्ली - ऑकलंड येथे रंगलेल्या न्यूझीलंडविरूद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात टीम इंडियाने दिमाखदार विजय साकारला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा एक षटक आणि सहा गडी राखून पराभव केला. नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने भारताला २०४ धावांचे आव्हान दिले होते. फॉर्मात असलेला लोकेश राहुल, कर्णधार विराट कोहली आणि मुंबईकर श्रेयस अय्यर यांनी केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने हे आव्हान सहज पेलले. ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारत आता १-० ने आघाडीवर आहे. या विजयासह भारताने एक खास विक्रम आपल्या नावावर केला.
हेही वाचा - अजित आगरकर घेणार एमएसके प्रसाद यांची जागा?
भारतीय संघाने चार वेळा टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २०० हून अधिक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग केला आहे. या यादीत ऑस्ट्रेलिया दुसर्या क्रमांकावर आहे. कांगारूंनी दोनवेळा ही कामगिरी नोंदवली आहे. तर, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, वेस्ट इंडीज, इंग्लंड आणि कतार यांनी एकदा हा पराक्रम केला आहे.
भारताने २०१९ मध्ये हैदराबाद येथे विंडीजविरूद्ध २०८ धावांचा पाठलाग करताना विजय साध्य केला होता. २००९ मध्ये श्रीलंकाविरूद्ध २०७ धावांचा आणि २०१३ मध्ये राजकोट येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या २०२ धावांचा पाठलाग करून विजय मिळवला आहे.