ब्रिस्बेन - भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी टी-२० विश्व करंडक स्पर्धेत विजयी शुभारंभ केला. वेस्ट इंडीजविरुद्धच्या सराव सामन्यात भारतीय संघाने अखेरच्या चेंडूवर थरारक विजय मिळवला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १०७ धावा केल्या होत्या. विंडीजला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी ३ धावांची गरज होती. तेव्हा पूनम यादवने चिनले हेन्रीला बाद करत संघाला विजय मिळवून दिला. हा सामना अॅलन बॉर्डर फील्डवर पार पडला. या आधी पाकिस्तानविरूद्धचा भारताचा सराव सामना पावसामुळे वाया गेला होता.
हेही वाचा - विराटचा नवा विक्रम, हॉलिवूडच्या अभिनेत्रीला टाकले मागे
भारताने दिलेल्या १०८ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ ७ गडी गमावत १०५ धावांवर आटोपला. सहाव्या षटकात ब्रिटनी कुपर (१) शिखा पांडेच्या गोलंदाजीवर बाद झाली. ली कर्बीने एका बाजुने डाव सावरला मात्र, तिला संघाला विजय मिळवून देता आला नाही. ती बाद झाल्यानंतर विंडीजच्या उर्वरित फलंदाजांनी निराशा केली.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीस उतरलेल्या भारताने २० षटकात ८ गडी गमावत १०७ धावा केल्या. भारताच्या दीप्ती शर्माने सर्वाधिक (२१) धावा केल्या. शामिलिया कॉनेल आणि अनीसा मोहम्मद यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. महिला टी-२० विश्वचषकामध्ये भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी होईल.
अखेरच्या षटकाचा थरार....
वेस्ट इंडीजला अखेरच्या षटकात विजयासाठी ६ चेंडूत ११ धावांची गरज होती. तेव्हा पूनम यादवच्या पहिल्या चेंडूवर दोन धावा निघाल्या. दुसऱ्या चेंडूवर विंडीजला चौकार मिळाला. तिसऱ्या चेंडूवर एक धाव निघाली. ३ चेंडूवर ४ धावांची गरज असताना पूनमने चौथ्या चेंडूवर हेले मॅथ्यूजला बाद केलं. पाचव्या चेंडूवर एक धाव निघाली. शेवटच्या चेंडूवर विंडीजला ३ धावांची गरज असताना पूनमने हेन्रीला बाद करत भारताचा विजय साकारला.