तिरुवनंतपुरम - वेस्ट इंडीज विरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली निराश झाला आहे. त्याने संघाच्या क्षेत्ररक्षणाबाबत नाराजी व्यक्त केली. त्याने खेळाडू अशाच प्रकारे क्षेत्ररक्षण करत राहिले तर विजय मिळवणे कठिण होईल, असे सांगितले.
भारत-वेस्ट इंडीज संघात ३ सामन्याची टी-२० मालिका खेळवण्यात येत आहे. मालिकेतील दोन सामने संपले असून यात भारतीय संघाने एक तर विंडीजने एक सामना जिंकला असून मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. दरम्यान, झालेल्या दोन्ही सामन्यात भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण खराब ठरले. यामुळे कर्णधार कोहलीने चिंता व्यक्त केली आहे.
रविवारी ग्रीनफिल्ड स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर वॉशिंग्टन सुंदरने, त्यानंतर यष्टीरक्षक ऋषभ पंतने झेल सोडला. जीवदानाचा फायदा घेत सिमन्सने नाबाद ६७ तर लुईसने ४० धावा चोपल्या. याच दोघांच्या खेळीने विंडीजने हा सामना ८ गडी राखून जिंकला.
सामन्यानंतर बोलताना विराट म्हणाला, 'आमचे क्षेत्ररक्षण या सामन्यात खराब ठरले. यामुळे आम्ही लक्ष्याचा बचाव करु शकलो नाही. वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत आमचे क्षेत्ररक्षण सुमार ठरले आहे. दुसऱ्या सामन्यात आम्ही एका षटकात दोन झेल सोडले, यामुळं आमच्यावर दबाव वाढत गेला.'
आम्हाला क्षेत्ररक्षणाबाबत दक्ष राहण्याची गरज असून आम्ही त्यात सुधारणा करु आणि मुंबईतील 'करो या मरो' सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरु, असेही विराट म्हणाला. दरम्यान, उभय संघात अखेरचा निर्णायक सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर ११ डिसेंबरला रंगणार आहे.
हेही वाचा - 'मैदान कुठलेही असो, षटकार मारणार'
हेही वाचा - रणजी करंडक २०१९-२० : पहिला दिवस, सर्व सामन्यांचा आढावा; वाचा एका क्लिकवर