विशाखापट्टणम - भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातला दुसरा एकदिवसीय सामना उद्या (बुधवार) विशाखापट्टणमच्या मैदानात होणार आहे. विंडीजने ३ सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना, शेमरॉन हेटमायर आणि शाय होप यांच्या द्विशतकी भागिदारीमुळे जिंकला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान, या सामन्यानंतर शाय होपचे मनोबल चांगलेच उंचावले असून त्याने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा विक्रम मोडण्याचा निर्धार बोलून दाखवला.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये २०१९ या वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये शाय होप १२२५ धावांसह तिसऱ्या क्रमाकांवर आहे. तर विराट कोहली १२९२ आणि रोहित शर्मा १२६८ धावांसह अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. २०१९ वर्ष संपण्यापूर्वी हे तीनही खेळाडू आणखी २ एकदिवसीय सामने खेळणार आहेत आणि याच दोन सामन्यात सातत्यपूर्ण कामगिरी करून विराट, रोहितला मागे टाकण्याचा निर्धार होपने केला आहे.
याविषयी बोलताना होप म्हणाला की, संघासाठी एक फलंदाज जास्तीत जास्त योगदान देण्याचा प्रयत्न करतो. या योगदानामुळे संघाने विजय प्राप्त केला तर त्याचे समाधान हे वेगळेच ठरते. दुसऱ्या सामन्यातही आम्ही विराट, रोहितला झटपट बाद करण्याचा प्रयत्न करु, अशी आम्हाला आशा आहे. त्यानंतर मी २०१९ या वर्षात सर्वाधिक धावांच्या विक्रमासाठी खेळ करेन आणि यात यशस्वी होईल.'
दरम्यान, विंडीजने पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा ८ गडी राखून पराभव केला. या सामन्यात शेमरॉन हेटमायर आणि शाय होप यांनी दुसऱ्या गडीसाठी द्विशतकी भागीदारी केली. हेटमायरने १३९ तर शाय होपने नाबाद १०२ धावा केल्या. दरम्यान, उभय संघात दुसरा एकदिवसीय सामना उद्या (बुधवार) रंगणार आहे.