नवी दिल्ली - वेस्ट इंडीज विरुध्दच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने रविचंद्रन अश्विनच्या ठिकाणी रविंद्र जडेजाला अंतिम ११ मध्ये संधी दिली. कोहलीने दिलेल्या या संधीचे सोनेही जडेजाने केले. त्याने पहिल्या डावात अर्धशतक झळकावत भारताचा डाव सावरला. कोहलीचा हा निर्णय अनेक माजी खेळाडूंना रुचला नाही आणि त्यांनी कोहलीवर टीका केली. आता या विषयावर भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग यानेही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हरजभजन सिंग याने विराट कोहलीच्या या निर्णयाचे समर्थन केले. तो म्हणतो, 'अश्विन विदेशी खेळपट्ट्यावर उल्लेखनीय कामगिरी करण्यात यशस्वी ठरत नसल्याचे दिसून येत आहे. याचे उदाहरण सांगायचे झाल्यास २०१८ साली झालेल्या इंग्लंडविरुध्दचा सामना. साऊदॅम्टन येथे खेळण्यात आलेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा गोलंदाज मोईन अलीने ९ गडी बाद केले. तर त्याच खेळपट्टीवर अश्विनला फक्त ३ गडी बाद करता आले. यामुळे आता पूर्वीसारखे प्रदर्शन अश्विनला करता येत नाही असे दिसत आहे.'
हरभजन पुढे बोलताना म्हणाला, २०१८-१९ मध्ये झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये अश्विनला संधी देण्यात आली. मात्र, या दौऱ्यामध्ये तो जखमी झाला. तरीही त्याला संघात कायम ठेवण्यात आले होते. सर्व बाबी पाहून खेळाडूला संघात जागा दिली जाते. अश्विन आणि जडेजामध्ये जडेजा गोलंदाजीसोबत चांगली फलंदाजी करु शकतो. हे त्याने सिध्द केलं आहे. यामुळं संघ व्यवस्थापनालाही वाटू लागले आहे की अश्विन संघासाठी योगदान देऊ शकत नाही. अस हरभजन यानं सांगितलं.
दरम्यान, अश्विनला पहिल्या कसोटी सामन्यात अंतिम ११ मध्ये संधी न देण्याच्या विराटच्या निर्णयावर भारताचे माजी खेळाडू सुनिल गावस्कर यांनी आर्श्चय व्यक्त केलं होतं.