मुंबई - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत शानदार कामगिरी केली. यामुळे त्याला मालिकावीरच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. दरम्यान, विराटने या मालिकेत सलग तीन सामन्यात अर्धशतक झळकावत अनेक विक्रमांना गवसणी घातली.
विराट कोहलीने पाचव्या आणि अखेरच्या निर्णायक सामन्यात नाबाद ८० धावांची खेळी केली. या कामगिरीसह तो टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा कर्णधार ठरला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचचा विक्रम मोडला. फिंचने ४४ सामन्यात १ हजार ४६२ धावा केल्या आहेत. तर विराटने ४५ सामन्यात १ हजार ५०२ धावा झोडपल्या आहेत. या यादीत केन विल्यमसन ४९ सामन्यात १ हजार ३८३ धावांसह तिसऱ्या स्थानी आहे. मॉर्गन १ हजार ३२२ आणि डू प्लेसिस १ हजार २७३ धावांसह अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानी आहेत.
विराट इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन टी-२० सामन्यात अपयशी ठरला. यानंतर त्याने सलग तीन सामन्यात अर्धशतक झळकावले. उभय संघातील मालिकेत विराटने ५ सामन्यात ११५.५० च्या सरासरीने २३१ धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी-२० मालिकेत एका फलंदाजाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे.
दरम्यान, उभय संघात आता तीन सामन्याची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेला २३ मार्चपासून पुण्यात सुरूवात होणार आहे. भारतीय संघ या मालिकेसाठी पुण्यात दाखल झाला आहे.
हेही वाचा - IND vs ENG : मालिका विजयानंतर भारतीय संघाला बसला फटका, विराटने केली चूक मान्य
हेही वाचा - IPL २०२१ : गोलंदाजांसाठी धोक्याची घंटा, धोनीचा ११४ मीटर लांब षटकार