अहमदाबाद - भारतीय आणि इंग्लंड यांच्यातील चौथा सामना टी-२० सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला जात आहे. भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडसमोर विजयासाठी १८६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताने निर्धारित २० षटकात ८ बाद १८५ धावा केल्या.
इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. तेव्हा रोहित शर्माने सामन्यातील पहिल्याच चेंडूवर षटकार खेचत आक्रमक सुरूवात केली. त्याने आदिल रशीदच्या गोलंदाजीवर षटकार खेचला. यानंतर त्याने याच षटकात चौकार देखील वसूल केला. रोहित-राहुल ही जोडी भारताला चांगली सुरूवात देणार असे वाटत असताना, जोफ्रा आर्चरने चौथ्या षटकात स्वतःच्याच गोलंदाजीवर रोहितचा सुरेख रिटर्न कॅच टिपला. रोहितने १२ चेंडूंत १२ धावा केल्या. यानंतर सूर्यकुमार आणि राहुल या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी ४२ धावांची भागिदारी केली. भारताने पहिल्या ६ ओव्हरमधील पावर प्लेमध्ये १ विकेट गमावून ४५ धावा केल्या. या दरम्यान रोहित शर्माची एकमेव विकेट गमावली.
भारताला ८व्या षटकात राहुलच्या रुपाने दुसरा धक्का बसला. बेन स्टोक्सने राहुलला (१४) जोफ्रा आर्चरकडे झेल देण्यास भाग पाडलं. यानंतर विराट कोहली (१) आदिल रशीदला पुढे येऊन मारण्याच्या नादात स्टम्पिंग झाला. यामुळे भारताची अवस्था ८.४ षटकात ३ बाद ७० अशी झाली. तेव्हा सूर्यकुमारने डावाचा ताबा घेत पंतसोबत फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. दोघांनी भारताला शंभरी गाठून दिली. या दरम्यान, सूर्यकुमारने आपले टी-२० कारकिर्दीतील पहिलं अर्धशतक झळकावले. सूर्याची विकेट सॅम करनने घेतली. तर झेल मलानने टिपला. सूर्यकुमारने ३१ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांसह ५७ धावांची खेळी केली. सूर्यकुमारच्या कॅचचा निर्णय वादग्रस्त ठरला.
सूर्यकुमार बाद झाल्यानंतर पंत आणि श्रेयस अय्यर या जोडीने इंग्लंडच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. दोघांनी मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. पंतची खेळी आर्चरने संपुष्टात आणली. त्याने १७व्या षटकात पंतला क्लीन बोल्ड केलं. पंतने २३ चेंडूत ४ चौकारासह ३० धावांची खेळी केली. हार्दिक पांड्याची खेळी बेन स्टोक्सने सुरेख झेल घेत संपुष्टात आणली. वूडच्या गोलंदाजीवर हार्दिक ११ धावांवर बाद झाला. अखेरच्या षटकात श्रेयस बाद झाला. अय्यरने १७ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकारासह ३७ धावांची खेळी केली. अय्यर पाठोपाठ सुंदर (४) बाद झाला. त्याचा झेल आदिलने पकडला. ठाकूर १० तर भुवी शून्यावर नाबाद राहिला. इंग्लंडकडून ऑर्चरने चार, रशिद, वूड, स्टोक्स आणि करन यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला.
हेही वाचा - विश्वकरंडक स्पर्धेचे पात्रता सामने स्थगित, कोरोनामुळे आयसीसीने घेतला निर्णय
हेही वाचा - २२ वर्षीय गोलंदाजाने उडवली धोनी दांडी, पाहा व्हिडिओ