अहमदाबाद - इंग्लंडविरुद्ध खेळवण्यात येत असलेल्या पाच टी-२० सामन्याच्या मालिकेत भारतीय संघ २-१ ने पिछाडीवर आहे. उभय संघात आज चौथा सामना होत आहे. हा सामना भारताच्या दृष्टीने 'करा किंवा मरा' अशा स्थितीतील आहे. तर दुसरीकडे इंग्लंडचा संघ विजयासह मालिका जिंकण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल.
राहुलचा फॉर्म संघासाठी डोकेदुखी
भारतीय संघाला सलामी जोडीकडून चांगल्या सुरूवातीची आशा आहे. पण अद्याप या जोडीकडून आश्वासक सुरूवात मिळालेली नाही. पहिल्या तीन सामन्यात के एल राहुल सपशेल अपयशी ठरला. त्याने अनुक्रमे १, ०, ० धावा केल्या. विशेष म्हणजे दुसऱ्या टी-२० सामन्यात इशान किशनने सलामीला येत अर्धशतकी खेळी केली. किशन इन फॉर्म असताना विराटने तिसऱ्या सामन्यात रोहित समवेत राहुलला सलामीला पाठवण्याचा जुगार खेळला. परिणामी हा जुगार भारताच्याच अंगलट आला.
इशान किशनकडून मोठ्या खेळीची आशा -
रोहित शर्माला तिसऱ्या सामन्यात संधी मिळाली पण तो देखील मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. कर्णधार विराट कोहली सातत्याने धावा करत आहे. इशान किशनकडून मोठ्या खेळीची आशा भारतीय संघाला आहे. ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या अखेरच्या षटकात धावगती वाढण्यासाठी ओळखले जातात. पण, गोलंदाजीत भारतीय आक्रमण निष्प्रभ ठरले आहे. फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल दोन्ही पराभूत सामन्यात महागडा ठरला. हार्दिक पांड्या देखील गोलंदाजीत अपेक्षित प्रभाव पाडू शकलेला नाही. भुवनेश्वर कुमारलाही पुनरागमन झोकात साजरे करता आलेले नाही.
इंग्लंडचा संघ लयीत
दुसरीकडे मार्क वूड आणि जोफ्रा आर्चर या वेगवान गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांवर वर्चस्व मिळवले. या दोघांनी तिसऱ्या सामन्यात गडी बाद करण्यासह खेळपट्टीवर उसळीचा लाभ घेतला. जोस बटलर तुफान फॉर्मात आहे. कसोटी मालिकेत अपयशी ठरलेल्या बेअरस्टोने तिसऱ्या सामन्यात नाबाद ४० धावा करत आपल्याला सूर गवसल्याचे संकेत दिले आहेत. पण, त्याचा महत्वाचा खेळाडू डेव्हिड मलानला अद्याप लय सापडलेली नाही. इंग्लंडचा संघ तिसऱ्या सामन्यातील संघ कायम ठेवण्याची दाट शक्यता आहे.
- भारतीय संघ -
- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, नवदीप सैनी, दीपक चाहर, राहुल तेवतिया आणि इशान किशन.
- इंग्लंडचा संघ -
- इयॉन मोर्गन (कर्णधार), जोस बटलर, जेसन रॉय, लियाम लिविंगस्टोन, डेविड मलान, बेन स्टोक्स, मोईन अली, आदिल राशीद, रीस टॉपले, क्रिस जोर्डन, मार्क वूड, सॅम कुरेन, टॉम कुरेन, सॅम बिलिंग्स, जॉनी बेयरस्टॉ आणि जोफ्रा आर्चर.
हेही वाचा - महिला क्रिकेट: पराभवाची मालिका सुरूच, पाचव्या वनडेत अफ्रिकेचा भारतावर ५ गडी राखून विजय
हेही वाचा - IPL संपेपर्यंत सर्व घरगुती स्पर्धा स्थगित; 'या' कारणाने BCCI चा मोठा निर्णय