अहमदाबाद - भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनच्या फिरकीचा सामना करणे सोपे नसल्याची कबुली इंग्लंडचा कर्णधार जो रुटने दिली आहे. अश्विनने इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील २ सामन्यात १७ विकेट घेत पाहुण्या संघाचे कंबरडे मोडले आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या सामन्याला अहमदाबादमध्ये उद्यापासून (ता. २४) सुरूवात होणार आहे. हा सामना डे-नाईट पद्धतीने खेळला जाणार आहे. या सामन्याआधी माध्यमाशी बोलताना रुट म्हणाला, 'अश्विन विश्वस्तरीय खेळाडू आहे. मला वाटतं की, त्याच्या फिरकीला तोंड देणं सोप्प नाही. विशेषकरून, डावखुऱ्या फलंदाजांना त्याची गोलंदाजी खेळण्यास अडचण येते. यावरुन तो किती कुशल गोलंदाज आहे हे कळतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डाव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या खेळाडूविरोधात त्याचा रेकॉर्ड खूप चांगला आहे.'
अश्विन स्वदेशात देखील चांगली कामगिरी करतो. त्याच्या फिरकीचा सामना करण्यासाठी आमच्या फलंदाजांना कठोर मेहनत घ्यावी लागेल. त्याच्याविरोधात धावा कशा जमवाव्या, यासाठी रणणिती आखावी लागेल, असे देखील रुटने सांगितलं.
दरम्यान, ३४ वर्षीय अश्विनने पहिल्या कसोटी सामन्यात ९ तर दुसऱ्या कसोटी सामन्यात ८ गडी बाद केले आहेत. याशिवाय त्याने फलंदाजीत देखील आपले योगदान दिलं आहे. चेन्नईतील दुसऱ्या कसोटी सामन्यात, फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर अश्विनने शतक झळकावले होते.
भारत-इंग्लंड मालिका सद्यघडीला बरोबरीत
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेली चार सामन्याची कसोटी मालिका सद्यघडीला १-१ अशा बरोबरीत आहे. उभय संघातील तिसरा सामना अहमदाबाद येथे दिवस-रात्र पद्धतीने खेळला जाणार आहे. उद्यापासून या सामन्याला सुरूवात होईल. ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने महत्वाची आहे. या मालिकेच्या निकालावर कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा दुसरा फायनलिस्ट मिळणार आहे. न्यूझीलंडचा संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी आधीच पात्र ठरला आहे.
हेही वाचा - 'तू माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर गिफ्ट', नटराजनने शेअर केला लेकीसोबतचा फोटो
हेही वाचा - IND vs ENG: डे-नाइट कसोटीत प्रथमच भारत आणि इंग्लंड आमने-सामने; गुलाबी चेंडूवर अग्निपरीक्षा