अहमदाबाद - नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. इंग्लंडच्या फिरकी माऱ्यासमोर भारताचा पहिला डाव १४५ धावांत आटोपला. जॅक लीच आणि जो रुट या दोघांनी भारताचे ९ गडी बाद केले. रोहित शर्माचा (६६) अपवाद वगळता एकाही भारतीय खेळाडूला आपल्या लौकिकास साजेशा खेळ करता आला नाही. पहिल्या डावांत भारतीय संघाला फक्त ३३ धावांची आघाडी मिळाली आहे.
पहिल्या दिवसाच्या ३ बाद ९९ धावांवरून भारतीय संघाने आजच्या खेळाला प्रारंभ केला. भारताची नाबाद जोडी रोहित शर्मा-अजिंक्य रहाणे यांनी सावध केला. भारताने पहिल्या डावात २ धावांची मिळवली. तेव्हा जॅक लीचने अजिंक्य रहाणेला (७) पायचित करत भारताला जबर धक्का दिला. त्यानंतर पुढच्याच षटकात लीचने रोहितला पायचित करत इंग्लंडला मोठी विकेट मिळवून दिली. रोहित ९६ चेंडूंत ११ चौकारांसह ६६ धावांवर माघारी परतला.
इंग्लंडचा कर्णधार जो रुट दुसऱ्या बाजूने गोलंदाजीसाठी आला. त्याने आपल्या पहिल्या तीन षटकांत एकही धाव न देता तीन ऋषभ पंत (१), वॉशिंग्टन सुंदर ( ०) आणि अक्षर पटेल ( ०) या तिघांना बाद केले. यामुळे भारताची अवस्था ३ बाद ११४ वरून ८ बाद १२५ अशी झाली. ११ धावांत भारताचे पाच फलंदाज माघारी परतले. त्यानंतर रुटने आर अश्विन (१७) आणि जसप्रीत बुमराह (१) ला माघारी जाण्यास भाग पाडले. रुटने ५ तर लीचने ४ गडी बाद केले. आर्चरने एक गडी बाद केला.
दरम्यान, डे-नाईट कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी फिरकीपटूंच्या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने इंग्लंडला ११२ धावांत गुंडाळलं. अक्षर पटेलने ६ तर अश्विनने ४ गडी बाद केले. झॅक क्रॉवलीने ५३ धावांची खेळी केली.
संक्षिप्त धावफलक
- इंग्लंड (पहिला डाव) –
- ४८.४ षटकांत सर्वबाद ११२ (झॅक क्रॉवली ५३, जो रुट १७, अक्षर पटेल ६/३८, अश्विन ३/२६)