मेलबर्न - भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सिडनीमध्ये दाखल झाला आहे. सर्व खेळाडू सद्या १४ दिवसांसाठी क्वारंटाइन आहेत. यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टिव्ह स्मिथने भारतीय गोलंदाजांना डिवचले आहे. जर माझ्याविरोधात शॉर्टपीच चेंडू टाकण्याचा प्लॅन करणार असाल तर त्याची मला भीती नाही, पण तुम्ही करत असलेल्या प्लॅनचा काहीही फायदा होणार नसल्याचे, असे स्मिथने म्हटलं आहे.
काय म्हणाला स्मिथ...
मी माझ्या जीवनात एवढ्या शॉर्टपीच चेंडूंचा सामना केला आहे की, आता मला शॉर्टपीच चेंडूची कसलीही चिंता वाटत नाही. जर माझ्याविरोधात भारतीय गोलंदाज शॉर्टपीच चेंडू टाकून मला बाद करण्याचा प्रयत्न करणार असतील तर त्याचा काहीही फायदा होणार नाही. उलट त्यामुळे भारतीय संघाचा तोटाच होईल, असे स्मिथने म्हटले आहे.
दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत नील वॅगनरने स्मिथला शॉर्ट पीच चेंडूवर 4 वेळा बाद केले आहे. याविषयी बोलताना स्मिथ म्हणाला, वॅगनर एक वेगळ्या दर्जाचा बॉलर आहे. भारतीय गोलंदाज त्याची पुनरावृत्ती करायला गेले तर ते पचतावतील. त्याच्यासारखी गोलंदाजी करणे भारतीय गोलंदाजांना जमणार नाही, कारण तो एक उत्कृष्ठ गोलंदाज आहे.
असा आहे भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा...
भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तीन टी-२०, तीन एकदिवसीय आणि चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या दौऱ्याला २७ नोव्हेंबरपासून सुरूवात होणार आहे. एकदिवसीय आणि टी-२० मालिका २७ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर दरम्यान, सिडनी आणि कॅनबरा येथे खेळवण्यात येणार आहे. यानंतर १७ डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरूवात होईल.
हेही वाचा - Ind Vs Aus : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा; पुकोस्वकीसह युवा खेळाडूंना संधी
हेही वाचा - Happy Diwali २०२०: विराट कोहली, रहाणेसमवेत देशी-विदेशी खेळाडूंनी दिल्या दीपोत्सवाच्या शुभेच्छा