मुंबई - भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेला १४ जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. पण, मालिका सुरू होण्याआधीच भारतीय संघ व्यवस्थापनापुढे सलामीला नेमकं कोणाला पाठवायचे, हा पेच निर्माण झाला आहे. कारण, श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत सलामीवर रोहित शर्माने विश्रांती घेतली होती. तेव्हा या मालिकेत शिखर धवन आणि लोकेश राहुल यांना सलामी करण्याची संधी मिळाली होती. या दोघांनीही दमदार सलामी दिली.
श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत शिखर आणि लोकेश यांनी भारताला चांगली सुरूवात दिली. तिसऱ्या टी-२० सामन्यात तर दोघांनी पहिल्या गड्यासाठी ९७ धावांची भागिदारी केली. दोघांनी या सामन्यात अनुक्रमे ५२ आणि ५४ धावा केल्या. मात्र, आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी रोहित शर्माची निवड संघात करण्यात आली आहे. त्यामुळे सलामीला कोण येणार, हे अद्याप स्पष्ट नाही.
भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी याबाबत सांगितले की, 'श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेमध्ये रोहित शर्मा खेळला नव्हता. पण तो चांगल्या फॉर्मात आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी रोहितला पहिली पसंती देण्यात येईल. पण रोहितबरोबर नेमका कोणता फलंदाज सलामीला येईल, याबाबत सध्या व्यवस्थापन विचार करत आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक -
- १४ जानेवारी - मुंबई
- १७ जानेवारी - राजकोट
- १९ जानेवारी - बंगळुरू
- ऑस्ट्रेलियाचा संघ -
- अॅरोन फिंच (कर्णधार), डी'आर्सी शॉर्ट, अॅश्टन अॅगर, अॅलेक्स करी (यष्टिरक्षक), पॅट कमिन्स, पीटर हँड्सकोम्ब, जोश हेझलवूड, मार्नस लाबुशेन, केन रिचर्डसन, स्टिव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, अॅश्टन टर्नर, डेव्हिड वॉर्नर आणि अॅडम झम्पा.
- भारतीय संघ -
- विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केदार जाधव, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर आणि जसप्रीत बुमराह.
हेही वाचा - भारत-ऑस्ट्रेलिया संघात १४ जानेवारीपासून 'महामुकाबला', वाचा कोण कोणावर भारी...
हेही वाचा - Ind vs Aus : भारताला धूळ चारण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा खास सराव, जाणून घ्या...