मुंबई - आपयीएलचे बारावे सत्र आता अंतिम टप्प्यात आले असून उद्या (रविवारी) मुंबई आणि चेन्नईमध्ये अंतिम सामना हैदराबाद येथे रंगणार आहे. या आयपीएलमध्ये कगिसो रबाडा, इम्रान ताहिर आणि श्रेयस गोपाल यांसारख्या गोलंदाजांनी आपल्या दमदार गोलंदाजीने फलंदाजांना जेरीस आणले. या मोसमात सर्वाधिक विकेट हे दिल्लीच्या कगिसो रबाडाच्या नावावर असून तो सध्या पर्पल कॅपचा मानकरी आहे. मात्र चेन्नईचा दिग्गज फिरकीपटू इम्रान ताहिरला रबाडाकडे असलेली पर्पल कॅप आपल्या नावे करण्याची सुवर्णसंधी असणार आहे.
आयपीएलच्या या मोसमात सर्वाधिक २५ बळी हे कगिसो रबाडाच्या नावावर आहेत. तर इम्रान ताहिरने आतापर्यंत २४ बळी घेतले आहेत. दोघांमध्ये अवघ्या एका बळीचे अंतर आहे. ताहिरला उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात रबाडाला पाठीमागे टाकण्याची संधी मिळणार आहे.
या सत्रात सर्वाधिक बळी घेण्याच्या यादीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या राजस्थानच्या श्रेयस गोपलने २० गडी बाद केले आहेत. तर दीपक चहर, खलील अहमद आणि मोहम्मद शमी यांच्या नावावर १९ बळीची नोंद असून ते अनुक्रमे चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या स्थानी आहे.