मुंबई - जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत इंग्लंड संघाची कामगिरी दिवसागणिक उंचावत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण इंग्लंड संघाने मायदेशात खेळताना पहिल्यांदा वेस्ट इंडीज त्यानंतर पाकिस्तान विरुद्धची मालिका जिंकली. या विजयासह इंग्लंडच्या गुणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. इंग्लंडचा विजयी सपाटा पाहता, अव्वलस्थानी असलेल्या भारतीय संघाला धोका असल्याचे म्हटलं जात आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल स्थानावर विराजमान आहे. पण भारताच्या या अव्वल स्थानाला आता धक्का बसू शकतो. कारण ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे दोन संघ भारतापेक्षा जास्त पिछाडीवर नाहीत. यात इंग्लंडने चांगली मुसंडी मारली आहे. सद्य घडीला इंग्लंड क्रमवारीत तिसऱ्या स्थानी आहे. तो दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलिया पेक्षा फक्त चार गुणांनी मागे आहे.
कोरोनानंतर पहिल्यांदा क्रिकेट खेळायला सुरुवात केलेल्या इंग्लंडने दोन कसोटी मालिका खेळल्या आणि त्या दोनही जिंकल्या. इंग्लंडने पहिल्यांदा वेस्ट इंडीजला २-१ अशा फरकाने पराभूत केले. त्यानंतर नुकत्याच झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत १-० असा विजय मिळवला. जर इंग्लंडने पाकिस्तानविरुद्धचे दोन कसोटी सामनेही जिंकले असते, तर ते ऑस्ट्रेलियालावर मात करून दुसऱ्या स्थानावर विराजमान झाले असते.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सद्य घडीला भारतीय संघ ३६० गुणांसह अव्वल स्थानावर विराजमान आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ २९६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियापेक्षा फक्त चार गुणांनी पिछाडीवर आहे आणि त्यांचे २९२ गुण झाले आहेत. दरम्यान, इंग्लंडने एक कसोटी मालिका जिंकली तर ते भारतीय संघाच्या अव्वल स्थानाला धक्का देऊ शकतात.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील क्रमवारी आणि गुण -
- भारत - ३६०
- ऑस्ट्रेलिया - २९६
- इंग्लंड - २९२
- न्यूझीलंड - १८०
- पाकिस्तान - १६६
- श्रीलंका - ८०
- वेस्ट इंडीज - ४०